![]()
रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अमरावती परिसरातील वीटभट्ट्यांवर आलेल्या आदिवासी आणि कोरकू मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमांनुसार वीटभट्टीवरच शिक्षणाची सोय उपलब्ध असणे आवश्यक असताना, ती पुरेशी उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुला-मुलींनी थेट विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. अविनाश बेलसरे, अनिल मावसे, सोनु भुसारे, उषा बेलसरे, प्रवीण धोटे, हरिष येवले, सुशिला धांडे आणि सुनील बेठेकर या मुलांनी आयुक्तांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. मुलांच्या समस्या ऐकून आयुक्त गुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि कायदेशीर चौकटीत शक्य असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्याचे आश्वासन दिले. गावात काम मिळत नसल्याने मेळघाटातील आदिवासी व कोरकू समुदायाला दरवर्षी दिवाळीनंतर रोजगारासाठी वीटभट्ट्यांवर स्थलांतर करावे लागते. सोबत आलेल्या मुलांना कामाच्या ठिकाणीच शिक्षण मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. मात्र, आदिवासी विकास विभाग या संदर्भात विशेष प्रयत्न करत नसल्याची मुलांची तक्रार आहे. सामाजिक न्याय, नियमित पोषण आहार, पाळणाघर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा, शुद्ध पाणी आणि कामाच्या ठिकाणी सावली यांसारख्या मूलभूत सुविधांची मागणी यावेळी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. ॲड. बंड्या साने यांनी या विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. यावेळी रामकिसन मावस्कर, वासुदेव बेलसरे, धर्मेंद्र शेरेकर, रामबाबू दहिकर, प्रणाली धांडे, ज्योती भुसूम, जासी जावरकर, गणेश आठवले, रामदास हिवराळे, राहुल आठवले आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मेळघाटातील विद्यार्थ्यांची ही समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ परतल्यानंतर गुंडे यांनी अपर आयुक्त अजय लहाने आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या आठवडाभरात त्या महसूल, आदिवासी विकास, जिल्हा परिषद, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.
Source link
वीटभट्टीवरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते:विभागीय आयुक्तांनी समस्या ऐकून उपाययोजना करण्याचे दिले निर्देश