Headlines

व्हिडिओ, शोषण आणि पैज:अमरावतीतील धक्कादायक कट कारस्थान समोर; मुलींच्या शोषणाचा घृणास्पद प्रकार उघड




अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या प्रकरणामागे एक भयानक आणि विकृत मानसिकतेचा खेळ लपलेला असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन तरुणांमधील एका विचित्र पैजेपासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती. आपल्यापैकी कोण जास्त मुलींना आकर्षित करू शकतो? या स्पर्धेने पुढे अत्यंत गंभीर गुन्ह्याचे रूप घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय 19) आणि त्याचा साथीदार उझेरखान इकबाल खान (वय 20) यांनी या पैजेचा विकृत छंद बनवला होता. अयान अहमद हा मुलींना फसवून त्यांच्यासोबत केलेल्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ बनवत असे. हे व्हिडिओ तो उझेरखानला पाठवत असे. सुरुवातीला ही एक प्रकारची स्पर्धा म्हणून सुरू झालेली बाब पुढे गंभीर गुन्ह्यात परिवर्तित झाली. या दोघांनी मिळून अनेक तरुणींना जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांनी या दोघांमध्ये पैशावरून वाद निर्माण झाला. याच वादातून रागाच्या भरात उझेरखानने अयानचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओंच्या माध्यमातूनच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या तपासात हे समोर आले की, आरोपींनी एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटो विविध माध्यमांवर प्रसारित केले होते. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. मुख्य आरोपी अयान अहमद हा आपल्या एका मित्राची खोली काही तासांसाठी भाड्याने घेत असे. त्या ठिकाणी तो मुलींना बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणात संबंधित मित्रालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या घटनांची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुली अजून समोर आल्या नसल्या तरी तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. अयान अहमद आणि उझेरखान व्यतिरिक्त मोहम्मद साद मोहम्मद साबीर (वय 22) आणि तरबेज खान तसलिम खान (वय 24) यांचाही सहभाग समोर आला आहे. हे आरोपी व्हिडिओ शेअर करणे आणि प्रसारित करण्यामध्ये सक्रिय होते. याशिवाय आणखी काही संशयितांची चौकशी सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. कठोर कारवाईची गरज या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी 45 सदस्यांची विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासली जात असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. समाजात वाढत चाललेल्या अशा विकृत प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. अमरावतीतील या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच नव्हे, तर सामाजिक मूल्यांवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *