Headlines

संभाजीनगरातील 'उत्तम उपहार गृह'वर FDA ची कारवाई:इमरतीसाठी प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित, तपासणीत आढळल्या त्रुटी




अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर राज्यात दुधातील भेसळ, बेकायदेशीर गुटखा आणि अस्वच्छ उपाहारगृहांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेची मोठी झळ आता छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सनाही बसू लागली आहे. शहराला जिभेवर रेंगाळणाऱ्या ‘इमरती’ची ओळख करून देणाऱ्या अतिशय जुन्या अन् नामांकित ‘मे. उत्तम उपहार गृह’वर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनाने या उपाहारगृहाचा परवाना तातडीने निलंबित करत आस्थापना बंद केली आहे. एफडीएच्या पथकाने जेव्हा या उपहार गृहाच्या स्वयंपाकघरात आणि उत्पादन कक्षात पाहणी केली, तेव्हा तिथे स्वच्छतेचे धिंडवडे उडाल्याचे अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. परवान्यात मोठी गफलत: संबंधित चालकाकडे केवळ ‘रेस्टॉरंट’ चालवण्याचा परवाना होता. मात्र, प्रत्यक्ष जागेवर मिठाईचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन केले जात होते, ज्यासाठी स्वतंत्र उत्पादक परवाना असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. आरोग्यास घातक तेलाचा पुनर्वापर: भजी आणि समोसे तळण्यासाठी तेच ते तेल वारंवार वापरले जात होते. टीपीसी तपासणीत या तेलाचे बीआर रीडिंग तब्बल ५८ आढळले, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तसेच इमरती आणि जिलेबीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तुपाचे (डालडा) बीआर रीडिंग ३६ नोंदवले गेले. ड्रेनेजच्या शेजारी अन्नपदार्थ: ग्राहकांच्या पोटाला त्रास देणारा अत्यंत संतापजनक प्रकार म्हणजे, इडलीसाठी आंबवायला ठेवलेले पीठ थेट गटाराच्या लाईनजवळ उघड्यावर ठेवण्यात आले होते. झुरळांचा वावर अन् अस्वच्छता: अन्न तयार करण्याच्या मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुरळे फिरत होती. पेस्ट कंट्रोल केल्याची कोणतीही अधिकृत नोंद आढळली नाही. स्वयंपाकघराच्या भिंतींवर जळमटे आणि काळपट तेलाचा जाड थर साचला होता. तंबाखूच्या पिचकार्या अन् कामगारांचे आरोग्य: अन्न शिजवण्याच्या जागेवरच कामगारांच्या तंबाखू व चुन्याच्या पुड्या आढळल्या असून भिंतींवर थुंकल्याचे डाग स्पष्ट दिसत होते. तसेच तिथल्या २५ ते ३० कामगारांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र प्रशासनाला दाखवता आले नाही. कृत्रिम रंगांचा अज्ञानाने वापर: मिठाई आकर्षक दिसण्यासाठी ‘टार्ट्राझिन’ (Tartrazine) या सिंथेटिक फूड कलरचा वापर केला जात होता. मात्र, त्याचा सुरक्षित वापर किती प्रमाणात करावा, याची कोणतीही माहिती तेथील कर्मचाऱ्यांना नव्हती. इतर गंभीर त्रुटी: कचरापेट्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या, खिडक्यांना जाळ्या नव्हत्या आणि संपूर्ण परिसरात कमालीची अस्वच्छता पसरली होती. नमुने प्रयोगशाळेत रवाना; एफडीएचा कडक इशारा या सर्व जीवघेण्या आणि गंभीर त्रुटींची तातडीने दखल घेत एफडीएने ‘उत्तम उपहार गृह’चा परवाना निलंबित करून दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तिथे वापरले जाणारे संशयास्पद तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने पुढील रासायनिक पृथक्करणासाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने सुरू केलेल्या या धडक सत्रामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. हे ही वाचा… तुकाराम मुंढेंचा मुंबई महापालिकेलाही दणका!:दररोज 7 ते 8 हजार जण जेवण करणारे BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; FDAची धडक कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाया राज्यभर सुरूच असून, आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयालाही बसला आहे. FDAच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकत तपासणी केली आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीन सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली भोजन व्यवस्था तात्पुरती बंद झाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *