Headlines

संभाजीनगर मनपाचा "स्वच्छतेची वारी" उपक्रम:बाबा पेट्रोल पंप ते छोटे पंढरपूर मार्गावर दिंडी, 200 हून अधिक कर्मचारी सहभागी




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‘स्वच्छतेची वारी… विठुरायाच्या दारी’ हा अभिनव उपक्रम आज उत्साहात पार पडला. छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासोबतच जनमानसात स्वच्छतेचा संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. महावीर चौकातून सकाळी १० वाजता महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेविका सीमा साळवे, आयुक्त अमोल येडगे, उप आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. या दिंडीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे २०० हून अधिक स्वच्छता कर्मचारी, आयसीटी टीम आणि १० हून अधिक घंटागाड्या सहभागी झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी झाडू, फावडे आणि स्वच्छतेची साधने घेऊन बाबा पेट्रोल पंप ते छोटे पंढरपूर या मार्गावर स्वच्छता केली आणि वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला. मार्गावरील कचरा संकलन, जनजागृती आणि वारकऱ्यांना आवश्यक ती मदत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि इतर सहाय्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. महापौर समीर राजूरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आयुक्त अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने ‘स्वच्छतेची वारी… विठुरायाच्या दारी’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम पुढील अनेक वर्षे सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.” स्थायी समिती सभापती अनिल मकरिये म्हणाले, “आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.” आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, “आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची ही महानगरपालिकेला लाभलेली मोठी संधी आहे. यंदा प्रथमच सफाई कर्मचाऱ्यांसोबत आयसीटी टीमही या सेवाकार्यात सहभागी झाली आहे. स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासोबतच वारकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अधिकारी आणि कर्मचारी सतत संपर्कात राहून वारकऱ्यांना मदत करतील.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *