![]()
एचपी गॅसच्या वर्धापन दिनानिमित्त ओम गुरुदेव गॅस एजन्सी आणि दै. दिव्य मराठी यांच्या वतीने सटाणा येथील बागलाण करिअर अकॅडमी परिसरात वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अकॅडमीच्या आवारात कडुलिंब, पिंपळ, चिंच आदींसह विविध प्रजातींच्या ५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच मालेगाव ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कैलास चावडे, ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे, दैनिक ‘ दिव्य मराठी’चे बागलाण तालुका प्रतिनिधी रमेश देसले, बागलाण करिअर अकॅडमीचे संचालक आनंदा महाले, राहुल महाले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की, रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. बागलाण करिअर अकॅडमीत मोठी स्वप्ने घेऊन शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी रक्तदान आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांत सहभागी होऊन देशसेवा व निसर्गसंवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला. अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रक्तदात्यास श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले.
Source link