![]()
सटाणा बागलाण तालुक्यातील विंचुरे, वटार आणि डोंगरेज या तीन गावांतील शेतकऱ्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर दुर्गम भागात तब्बल दीड किलोमीटर लांबीचा व २० फूट रुंदीचा रस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणारा त्रास या उपक्रमामुळे दूर झाला असून, तिन्ही गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील नागरिकांना शेतजमिनींकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नव्हता. शासकीय नोंदी आणि शिवार नकाशातही रस्त्याचा उल्लेख नसल्याने नागरिकांना सुमारे दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होत होते. ही समस्या लक्षात घेऊन विंचुरे येथील प्रगतिशील शेतकरी दीपक बच्छाव यांनी पुढाकार घेत तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना एकत्र आणले. लोकसहभागातून आर्थिक मदत, जेसीबी व ट्रॅक्टरची व्यवस्था करून श्रमदानातून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या रस्त्यामुळे शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा तसेच नागरिकांचे दैनंदिन दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. भविष्यातही गावाच्या विकासासाठी अशाच लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे परिसरात एकी आणि सामूहिक श्रमशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. वटार आणि डोंगरेज गावांतील ग्रामस्थांनी श्रमदान व लोकसहभागातून उभारलेला दीड किलोमीटर लांबीचा रस्ता व उपस्थित शेतकरी. रस्ता टिकाऊ राहावा, यासाठी दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्यात आले. या कामादरम्यान दोन विहिरी बुजविण्यात आल्या, तर एका शेतकऱ्यास नवीन विहीर बांधून देण्यात आली. तसेच मार्गातील पत्र्याचे शेड हटवून परस्पर सामंजस्याने सर्व अडथळे दूर करण्यात आले.
Source link
सहभागातून साकारला दीड किमी रस्ता:विंचुरे, वटार आणि डोंगरेजच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून साधला विकास