Headlines

सहावीचे पुस्तक वादात:बालभारतीच्या 6 वीच्या इतिहासातून 'मांसाहार' आणि 'जातिव्यवस्था' गायब; नेमके प्रकरण काय, घ्या जाणून




महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) इयत्ता 6 वीच्या इतिहासाच्या नव्या रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. वैदिक काळातील समाज केवळ ‘वनस्पती-आधारित’ आहार घेत होता आणि तो अत्यंत गुण्यागोविंदाने राहत होता, असा नवा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र, जुन्या पुस्तकातील संदर्भ बदलून इतिहास वस्तुस्थितीऐवजी ‘धार्मिक दृष्टिकोनातून’ मांडला जात असल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतल्याने पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमका काय फरक आहे? बालभारतीने केलेल्या बदलांमुळे जुन्या आणि नवीन पुस्तकातील मांडणीत मोठी तफावत निर्माण झाली आहे आहारपद्धतीबाबत बालभारतीच्या सहावीच्या जुन्या पुस्तकात वैदिक काळातील लोक अन्नात भाज्यांसोबतच मांसाहाराचाही वापर करत असल्याचा स्पष्ट उल्लेख होता, तर नवी पुस्तकात मात्र, वैदिक काळातील लोकांच्या आहारात केवळ धान्य, दूध, दही, तूप, मध आणि भाज्यांचा समावेश होता. त्यांचा आहार पूर्णपणे ‘वनस्पती-आधारित’ होता, असा दावा केला आहे. यासंबंधीचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. जातिव्यवस्था आणि असमानता जातिव्यवस्थेबाबत बालभारतीच्या सहावीच्या जुन्या पुस्तकात ‘ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण सुरुवातीला व्यवसायावर आधारित होते, पण नंतर ते जन्मावरून ठरवले जाऊ लागले. यातूनच जाती निर्माण झाल्या आणि समाजात असमानता आली,’ असे स्पष्ट लिहिले होते. मात्र, नवीन पुस्तकात ‘नव्या रचनेतून ‘जातींमुळे समाजात असमानता आली’ हा संदर्भच पूर्णपणे वगळला आहे. त्याऐवजी, ‘लोक सहकार्य आणि आपुलकीने राहत होते आणि प्रत्येकाची समाजात विशिष्ट जबाबदारी होती,’ अशी मांडणी करण्यात आली आहे. अभ्यासक काय म्हणतात? संस्कृतचे अभ्यासक प्रा. श्रीकांत बहुलकर यांच्या ‘बिब्लिओग्राफी ऑफ डायटेटिक्स इन एन्शंट अँड मिडिएव्हल इंडिया’ या ग्रंथाचा हवाला देत वैदिक वाङ्मयात पाहुण्यांसाठी बैल किंवा बोकड शिजवण्याची पद्धत होती, तसेच घोडे, गाई, शेळ्या आणि म्हशींचे मांस वापरले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनीही वैदिक विधींमध्ये आणि रोजच्या व्यवहारात मांसाहाराचे स्पष्ट उल्लेख असल्याचे म्हटले आहे. “इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न” – तज्ज्ञांचे मत नव्या पुस्तकातील या दाव्यांवर नामवंत इतिहासतज्ज्ञ आणि प्राध्यापकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे: “नवीन पुस्तकातील परिच्छेदांमधून मांसाहाराचे पुरावे जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहेत. या युगाला केवळ धार्मिकता, शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक म्हणून सादर करून वैदिक काळाचे अवाजवी उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न वाटतो. वास्तविक पाहता, प्राचीन भारतात मांसाहार केला जात असल्याचे विपुल ग्रंथीय आणि पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत.”— डॉ. उपिंदर सिंग (इतिहासाच्या प्राध्यापक, अशोका विद्यापीठ) इतिहास समिती आणि बालभारतीची भूमिका या वादावर ‘बालभारती’च्या इतिहास समितीच्या अध्यक्ष आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ शुभांगना अत्रे यांनी नवीन बदलांचे समर्थन केले आहे. वैदिक काळात मांसाहार होता हे मान्य करतानाच त्या म्हणाल्या, “शेतीचा शोध लागल्यानंतर वनस्पती-आधारित अन्न हा लोकांच्या आहाराचा मुख्य भाग बनला होता. जुन्या ग्रंथांमधील उल्लेख आहारापेक्षा संस्कृतीच्या प्रगतीबद्दल अधिक होते, म्हणूनच लेखकांनी नवीन पुस्तकात त्याचा अंतर्भाव केला नसावा.” पुढील पाऊल काय? या वादाची दखल बालभारतीने घेतली आहे. निर्माण झालेल्या मतमतांतरांवर बोलताना बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले की, “पाठ्यपुस्तकातील या मुद्द्यांवर आम्ही पाठ्यपुस्तक निर्मिती समितीशी सविस्तर चर्चा करू आणि आवश्यकतेनुसार पुढील आवृत्त्यांमध्ये योग्य ते बदल केले जातील.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *