Headlines

भिवंडी बायपासवर जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकाची निर्घृण हत्या:दरोड्याच्या उद्देशाने मानेवर चाकूने केले वार, दोघांना अटक




भिवंडी बायपास रस्त्यावर जेवणासाठी थांबलेले ट्रक चालक पवनकुमार काजू महतो (वय 33, मूळ रा. बिहार) यांची दरोड्याच्या उद्देशाने हत्या करणाऱ्या रमीज अब्दुल रशीद अन्सारी (वय 23) आणि मोहम्मद अलकेश परवेज आलम मोमीन (वय 25, दोघे रा. भिवंडी) या दोन आरोपींना कोनगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर कोणताही स्पष्ट पुरावा उपलब्ध नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सखोल तपासणी करून अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याची उकल केली असून, भिवंडी परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील टाटा आमंत्रा परिसरात मध्यरात्री 2:45 च्या सुमारास जेवणासाठी थांबलेले ट्रेलर (क्र. MH 46 BU 2110) चालक पवनकुमार महतो यांना दोन आरोपींनी लुटण्याच्या उद्देशाने चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, पवनकुमार यांनी या घटनेला तीव्र प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांच्या मानेवर धारदार चाकूने वार करून त्यांची हत्या केली आणि जवळील रोकड लुटून दुचाकीवरून पोबारा केला. या गंभीर घटनेप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी विशेष पथकांची स्थापना घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेगाने सुरुवात करण्यात आली. या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश बोरसे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष बोराटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पाच विशेष पोलिस पथकांची तातडीने स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींना अटक घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना, केवळ प्रत्यक्षदर्शींनी दिलेले वर्णन आणि संशयित दुचाकीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सलग तीन दिवस भिवंडी परिसरातील तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आणि अचूक तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी रमीज अन्सारी व अलकेश मोमीन यांची ओळख पटवली. त्यानंतर या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी रमीज याच्या नावावर एका गुन्ह्याची नोंद आहे. तर, मुख्य आरोपी अलकेश मोमीन हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी आणि साखळी चोरी (स्नॅचिंग) यांसारखे तब्बल 18 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *