Headlines

बारामतीत उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, 'कोणाचीही गय करू नका' म्हणत कडक कारवाईचे आदेश




मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याच दिवशी महाराष्ट्रातील आणखी एका नामांकित तरुण उद्योजकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती विमानतळ परिसरातील गोजुबावी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ‘राणा शिपिंग कंपनी’चे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यातून सूर्यवंशी थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या गंभीर घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तातडीने ॲक्शन मोडमध्ये आल्या असून त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोनवरून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. बारामती विमानतळाजवळ नेमकं काय घडलं? रविवार, 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बारामती आणि पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राणा सूर्यवंशी हे बारामतीहून दौंडच्या दिशेने जात असताना बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी येथे एका जमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी थांबले होते. पुष्पगुच्छाचा बहाणा अन् हल्ला सूर्यवंशी तेथे थांबलेले असताना काही अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ (Bouquet) देण्याचा बहाणा केला. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता हल्लेखोरांनी अचानक शस्त्रे बाहेर काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला व गोळीबार केला. थोडक्यात बचावले; पुण्यात उपचार सुरू हल्लेखोरांनी केलेल्या या अनपेक्षित हल्ल्यात राणा सूर्यवंशी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ते मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोण आहेत उद्योजक राणा सूर्यवंशी? राणा सूर्यवंशी हे मूळचे बारामती तालुक्यातील माळेगाव येथील रहिवासी आहेत. सध्या ते कौटुंबिक कारणास्तव पुण्यात वास्तव्यास असतात. ते कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या ‘राणा शिपिंग कंपनी’चे सर्वेसर्वा आहेत. याशिवाय शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी सोलापुरातही झाला होता हल्ला राणा सूर्यवंशी यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांना शासनाकडून ‘वाय प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रविवारी गोजुबावी येथे घटना घडली तेव्हा त्यांची अधिकृत ‘वाय प्लस’ सुरक्षा त्यांच्यासोबत उपस्थित नव्हती. केवळ काही खाजगी अंगरक्षक त्यांच्यासोबत होते. नेमकी याच संधीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये बारामतीतील या गुन्हेगारी घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ आणि अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. “बारामतीसारख्या शांत आणि संवेदनशील भागात उद्योजकावर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा गुन्हेगारी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला. पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना त्यांनी सर्व तपास यंत्रणा तात्काळ सक्रिय करण्याचे आदेश दिले. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे निर्देश दिले. तसेच राणा सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली. सुरक्षा मागे का ठेवली होती, याची चौकशी सुरू या हल्ल्याच्या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राणा सूर्यवंशी यांना शासनाने ‘वाय प्लस’ सुरक्षा दिलेली आहे. मात्र, काही वैयक्तिक किंवा इतर कारणांमुळे त्यांनी स्वतःच आपले अधिकृत सुरक्षा रक्षक मागे ठेवले होते. त्यांच्यासोबत शासकीय सुरक्षा कवच नसतानाच हा हल्ला घडला आहे. या घटनेमागील सर्व कारणे, वैमनस्य आणि हल्लेखोरांचे धागेदोरे लवकरच पोलीस तपासातून समोर येतील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एकाच दिवशी मुंबईत जुहू येथे टायगर श्रॉफच्या गाडीवर 10 गोळ्या झाडल्या जाणे आणि दुसरीकडे बारामतीत नामांकित उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार होणे, या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर विरोधकांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. —————————————— हेही वाचा… दाऊदनंतर बिश्नोई गँगचा महाराष्ट्रावर कब्जा करण्याचा डाव!:गृहखात्याचा धाक संपलाय की सरकारच्या आशीर्वादानेच दहशत माजवली जातेय? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल “राज्यात सुरुवातीला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली, त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या सर्व घटनांची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी उघडपणे स्वीकारत आहे. याचा सरळ अर्थ असा की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँग संपूर्ण महाराष्ट्रावर आपला ताबा मिळवण्यासाठी आणि आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी सरसावली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत दिवसाढवळ्या सिनेस्टार आणि राजकीय नेत्यांवर गोळ्या झाडून दहशत निर्माण केली जात असताना गृहखाते नक्की काय करत आहे? गँगस्टर्सना मिळणारे हे बळ आणि हिंमत सरकारच्या आशीर्वादानेच चालली आहे का, याचा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे,” असा घणाघाती सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *