Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:व्याजाच्या पैशांसाठी तगादा; सहा खासगी सावकारांविरोधात गुन्हा




मसाल्याच्या व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवरून वाढीव व्याजाची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अशोक सुतार (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुतार यांनी 19 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत व्यवसायासाठी सुरेश सावंत (शाहूपुरी), अक्षय दळवी व रोहित दळवी (दोघे रा. परळी, ता. सातारा), अमित शिंदे (रा. झरेवाडी, ता. कोरेगाव), दत्तात्रय जगताप (रा. भोंदवडे, ता. सातारा) आणि सागर गोळे (रा. जकातवाडी, ता. सातारा) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान, घेतलेल्या रकमेच्या परतफेडीवरून संबंधितांकडून सुतार यांच्याकडे अधिक व्याजाची मागणी करण्यात आली. मुद्दल रक्कम अद्याप बाकी असल्याचे सांगत फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटीत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस हवालदार घोडके करीत आहेत. मारहाण करून धमकावल्याचा आरोप; दोघांवर पोलिसांत तक्रार क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना सातारा शहरात घडली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज शेख (रा. कामाठीपुरा, ता. सातारा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार रहीम शेख आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघेही देवी कॉलनी, सातारा येथे राहतात. तक्रारीनुसार संबंधितांनी रियाज शेख यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नोंद सातारा शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास महिला पोलिस नाईक बोराटे करीत आहेत. पॉवर हाऊस उपकेंद्रातून 73 बसबार लंपास; तीन लाखांचा फटका पॉवर हाऊस उपकेंद्र परिसरातून तब्बल 300 किलो वजनाचे 73 बसबार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज तात्यासो खिलारे (रा. विसावा नाका, सातारा) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. 7 मार्च ते 21 जुलै या कालावधीत पॉवर हाऊस उपकेंद्रातून अज्ञात व्यक्तीने अंदाजे 300 किलो वजनाचे 73 बसबार चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे. उपकेंद्रातून विद्युत उपकरणांचे साहित्य चोरीला गेल्याने संबंधित यंत्रणेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत. साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सातारा शहर व तालुका पोलिसांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच एका दुचाकीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. निगडी तर्फ सातारा गावच्या हद्दीत 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई केली असता संदीप सर्जेराव शिंदे (रा. वेणेगाव, ता. सातारा) हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 905 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरातील चिकन सेंटरच्या शेडच्या आडोशालाही जुगार सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत राजेश संपतराव कदम (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 55 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सातारा शहरातून दोन व्यक्ती बेपत्ता; पोलिसांत स्वतंत्र नोंदी सातारा शहर परिसरातून दोन व्यक्ती वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. करंजे पेठ येथील लक्ष्मण भिवराम खुडे हे 28 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत दौलतनगर येथील अमृत जगन्नाथ लावंड हे 25 ऑगस्ट रोजी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन्ही घटनांची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून लक्ष्मण खुडे प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार वाघ, तर अमृत लावंड प्रकरणाचा तपास महिला पोलिस हवालदार वरे करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *