Headlines

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही




अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सच्चिदानंद सिंह यांचे मुख्य आक्षेप काय आहेत? सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबत काही तांत्रिक आणि घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत: प्रफुल्ल पटेलांचे अधिकार डावलले: 28 जानेवारीला अजित पवार यांच्या निधनानंतर, 17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या सुधारित घटनेनुसार, नवीन अध्यक्ष निवडेपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षांचे सर्वाधिकार होते. बैठकीची कायदेशीरता: कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्वाधिकार असताना, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? परवानगीचा अभाव: 26 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिले, त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची संमती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. नोटीस प्रकरणावर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले? या वाढत्या वादावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही. त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरूनच झाली आहे,” असे पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षातील सद्य:स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षात काही सुधारणा आवश्यक आहेत, हे माझे वैयक्तिक मत आहे.” षडयंत्रामागे मास्टरमाइंड कोण? जय पवारांच्या भूमिकेकडे लक्ष सच्चिदानंद सिंह हे गेल्या 15 वर्षांपासून पक्षाशी जोडलेले आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असताना त्यांची डिसेंबर 2023 मध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या निवडीवेळी (26 फेब्रुवारी 2026) जाहीर झालेल्या कार्यकारिणीत त्यांना वगळण्यात आले. सिंह यांनी ही नोटीस स्वतःहून पाठवली की यामागे पक्षातीलच एखाद्या ‘मास्टरमाइंड’ बड्या नेत्याचे डोके आहे, याचा शोध आता वरिष्ठ पातळीवरून घेतला जात आहे. यावर आता पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलहाची पार्श्वभूमी: पटेल-तटकरे विरुद्ध पवार कुटुंबीय? काही महिन्यांपूर्वी, निवडणूक आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहारात सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे केवळ ‘गटनेते’ (अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा) अशी नमूद करून त्यांच्या आधीच्या अधिकृत पदांचा उल्लेख टाळला होता. हा संभ्रम चार महिने उलटूनही दूर झालेला नाही. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये वाढते केंद्रीकरण आणि पवार कुटुंबातील निष्ठावंतांना दिले जाणारे झुकते माप, यामुळे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात पक्षातील ही पोकळी आणि अंतर्गत कलह शांत करून सामूहिक नेतृत्व निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *