Headlines

हेमंत भावसार यांनी दुचाकीवर गाठले लडाख:6,434 किमीचा प्रवास; उमलिंग-ला मार्ग गाठत साकारले अनेक वर्षांचे स्वप्न‎




येथील दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा भावसार ऑप्टिशियनचे संचालक हेमंत रविंद्र भावसार यांनी दुचाकीवर प्रवास करून लडाखची ‘सोलो’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ६,४३४ किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांनी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग-ला मार्गावरून प्रवास करून अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. भावसार यांना मोटारसायकल भटकंतीची विशेष आवड आहे. १५ जून रोजी त्यांनी लासलगाव येथून मोहिमेला सुरुवात केली. ४ जुलै रोजी मोहीम पूर्ण करून ते लासलगावात परतले. संपूर्ण प्रवास त्यांनी ‘सोलो रायडर’ म्हणून एकट्याने पूर्ण केला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सलग २४ तासांत सुमारे १,२३० किलोमीटर अंतर पार करून दिल्ली गाठली. त्यानंतर जम्मू, श्रीनगरमार्गे लडाखमध्ये प्रवेश करत विविध उंच पर्वतीय घाट, बर्फाच्छादित रस्ते, पाण्याचे प्रवाह, डोंगर कापून तयार केलेले मार्ग आणि प्रतिकूल हवामानाचा धैर्याने सामना केला. लडाख परिसरातील संपूर्ण सर्किट पूर्ण करून मनालीमार्गे दिल्ली आणि तेथून अवघ्या २७ तास ३० मिनिटांत लासलगाव गाठत त्यांनी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या साहसी कामगिरीबद्दल माजी आमदार कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, संजय पाटील, लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, वेदिका होळकर, सोनिया होळकर, गुणवंत होळकर, प्रकाश दायमा तसेच दुर्गा मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी त्यांचे अभिनंदन केलेया मोहिमेदरम्यान हेमंत रविंद्र भावसार यांनी खारदुंग-ला, चांग-ला, पँगाँग सरोवर, नुब्रा व्हॅली आदी पर्यटनस्थळांनाही भेट दिली. प्रतिकूल परिस्थितीतही सुरक्षित प्रवास करत त्यांनी साहसी पर्यटनाची आवड जोपासली. त्यांच्या या यशस्वी मोहिमेचे लासलगाव परिसरात कौतुक होत असून, युवकांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात देशातील इतर दुर्गम भागांमध्येही अशाच साहसी मोहिमा राबविण्याचा त्यांचा मानस आहे.. लडाखला सोलो रायडिंग करणे हे माझे अनेक वर्षांचे स्वप्न होते. बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस, गोठवणारी थंडी, पाण्याचे प्रवाह आणि अत्यंत खडतर रस्त्यांचा सामना करत उमलिंग-ला मार्गावर दुचाकी चालवण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला. हा प्रवास स्वतःला ओळखण्याचा आणि मानसिक-शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा होता. भविष्यातही अशाच साहसी मोहिमा राबवून युवकांना सुरक्षित व शिस्तबद्ध बाइक रायडिंगसाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न राहील.- हेमंत भावसार, लासलगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *