![]()
हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट ‘चीज ॲनालॉग’ खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी बनावट चीज ॲनालॉग वापरल्यास, त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 27 एप्रिल 2026 पासून ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्राने सुरू केलेल्या या मोहिमेची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) हा नियम आता देशभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. FSSAI ने 21 एप्रिल 2026 रोजी विशेष परिपत्रक काढून हा नियम सर्व राज्यांसाठी अनिवार्य केला आहे. शुद्ध पनीर आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत महाराष्ट्राने दाखवलेली ही दिशा आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरली असून, यामुळे ग्राहकांची होणारी मोठी आर्थिक आणि आरोग्यविषयक फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे. विधानसभा सभागृहात लोकप्रतिनिधींनी पनीरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेले हे ‘ॲनालॉग’ हुबेहूब नैसर्गिक पनीरसारखेच दिसत असल्याने सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल होत होती. ही फसवणूक रोखण्यासाठी मंत्री झिरवाळ यांनी हॉटेलमध्ये पारदर्शकतेचे कडक आदेश लागू केले असून, आता ‘ॲनालॉग’चा वापर केल्यास तसा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असेल. महाराष्ट्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला केंद्र सरकारच्या FSSAI ने देखील पाठिंबा दिला असून, त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक आता निर्गमित करण्यात आले आहे. काय आहेत नियम? अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 1 मे 2026 पासून प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला खाद्यपदार्थांबाबत पारदर्शकता राखणे बंधनकारक करण्यात आले असून, दुधाच्या नैसर्गिक पनीरऐवजी वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेले ‘ॲनालॉग’ वापरल्यास त्याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे अनिवार्य असेल. या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, माहिती लपवणाऱ्या हॉटेल चालकांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. ग्राहकांना आपण नक्की काय खातोय हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या निमित्ताने दिला आहे. नवीन नियमांनुसार आता चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले असून, हॉटेल संघटनांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सर्व विभागीय अन्न आयुक्तांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टॉरंट व्यावसायिक आणि केटरर्सना बल्क मेसेजद्वारे या नव्या नियमांची माहिती दिली जात असून, या पारदर्शकतेमुळे हॉटेलमधील ‘शाही पनीर’ सारखे पदार्थ आता खरोखरच शुद्ध मिळणार आहेत, ज्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच ग्राहकांची दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पनीर आणि चीज ॲनालॉगमध्ये काय फरक आहे? अन्न सुरक्षा मानके विनियम 2011 नुसार ‘पनीर’ हा केवळ दुधापासून तयार केलेला शुद्ध पदार्थ असणे अनिवार्य असताना, हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये सध्या खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून तयार केलेल्या ‘चीज ॲनालॉग’चा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले आहे. दिसायला हुबेहूब पनीरसारखा असला तरी हा पदार्थ तांत्रिकदृष्ट्या पनीर नसल्याने, आता हॉटेल्सना त्यांच्या मेन्यूकार्ड, बिल आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आणि व्यावसायिकांनी कोणताही पदार्थ खरेदी करताना किंवा वापरताना त्याच्या लेबलवर ‘चीज ॲनालॉग’ असा उल्लेख आहे का, हे काळजीपूर्वक तपासूनच शुद्धतेची खात्री करावी.
Source link
हॉटेलमध्ये आता 'शुद्ध पनीर'च मिळणार!:बनावट वापरल्यास मेन्यूकार्डवर उल्लेख करणे अनिवार्य; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय