Headlines

"12 गाड्या ओढण्याची' प्रथा रोखा; अंनिसची पोलिसांकडे धाव:वरखेड यात्रेतील प्रथा व पशुबळीविरोधात कारवाईची मागणी‎




नेवासे तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रेत दरवर्षी होणाऱ्या कथित ‘१२ गाड्या ओढण्याच्या’ प्रथेवर आणि उघड्यावर होणाऱ्या कथित बेकायदेशीर पशुबळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेत पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ७ ऑगस्टच्या यात्रेत ‘अंगात आल्याचा’ आव आणून १२ गाड्या ओढण्याचा प्रकार व पशुबळी होण्याची शक्यता असल्याने ते रोखावेत, अशी मागणी करण्यात आली. या प्रथेमुळे यापूर्वी अपघात होऊन जीवितहानी झाल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. अंनिसने संबंधित प्रकार हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा करत आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कडक पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तातडीने वरखेड येथे भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधितांना शासकीय नोटिसा देण्यात आल्या असून, असे प्रकार होऊ नयेत, याबाबत सूचना करण्यात आल्या. ग्रामस्थांनी या प्रकारांत गावकऱ्यांचा सहभाग नसून बाहेरून येणारे काही भाविक हे कार्यक्रम आयोजित करतात, अशी भूमिका पोलिसांसमोर मांडल्याची माहिती मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *