.

जिल्ह्यात हवामानाचा विचित्र खेळ सोमवारी जाणवला. तब्बल १५ दिवसांनी ११ मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४५.२ होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता ३३.९ अंश सेल्सिअस असलेले तापमान संध्याकाळ ५.३० वाजता ४५.१ अंशापर्यंत पोहोचले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ११.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी ६ नंतर मात्र ढग दाटून आले. एकीकडे पारा वाढतच असतानाच दुसकरीकडे हवामान विभागाने आगामी दिवसात पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
यंदा मार्चमध्येच प्रचंड तापले. २ मार्च रोजी तर अकोल्यात भारतात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पारा ४६.९पर्यंत पारा होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे हातपाय भाजल्यासारखे जाणवत होते.
डोक्याला दुपट्टा बांधूनही उन्हापासून संरक्षण होत नसल्याचे जावणवत होते. उन्हाची तीव्रता दुपारनंतर प्रचंड वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. मात्र २८ एप्रिलनंतर पारा ४५ पेक्षा कमी होता. आता ११ मे रोजी मात्र कमाल तापमान ४५ अंशा पेक्षा जास्त नोंदवण्यात आले. शहर तापमान अकोला ४५.१ अमरावती ४४.० भंडारा ४२.० बुलडाणा ४३.२ ब्रह्मपुरी ४२.२ चंद्रपूर ४१.० गडचिरोली ४०.६ गोंदिया ३९.२ नागपूर ४२.० वर्धा ४३.८ वाशीम ४२.६ यवतमाळ ४१.४
विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तज्ज्ञ आणि ‘स्कायमेट’ संस्थेच्या अंदाजानुसार, अंदमानात यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. यापूर्वी १४ ते २२ मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र नव्या परिस्थितीनुसार मान्सून आणखी लवकर सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
विदर्भात अकोला सर्वाधिक तापले