![]()
पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एस. पी. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात हा शिष्यवृत्ती वितरण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी, ‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही,’ असे प्रतिपादन केले. मंत्री पाटील म्हणाले की, आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी केवळ पैशांअभावी शिक्षण मिळू शकत नाही, अशी स्थिती सध्या समाजात नाही. मात्र, मदतीसाठी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणताही संकोच न बाळगता आपली वस्तुस्थिती इतरांना सांगितली पाहिजे, कारण अडचण सांगितल्याशिवाय मदत मिळणार नाही. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि अभय भुतडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, खजिनदार प्रसाद पानसे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेवक अमर आवळे, नगरसेविका प्रियांका शेंडगे व स्मिता वस्ते, माजी नगरसेविका मनीषा घाटे, तसेच विशाल पवार, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत सुर्वे, राजेंद्र पाटे, अनिल पाटील, सुधीर शिंदे आणि कमलेश महाले उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून धीरज घाटे यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, उद्योजक अभय भुतडा यांनी केवळ आर्थिक प्रगती न साधता सामाजिक कार्यातही योगदान देण्यास सुरुवात केल्याचे नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गरिबीचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला. मंत्री पाटील यांनी सांगितले की, ते दरवर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत करतात, ज्यात प्रामुख्याने मुलींना मदत केली जाते. कारण मुलगी शिकल्यास ती संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावते. एकल महिला पालकांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकारकडून नियोजन सुरू असून, त्याचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मुलांचे शरीर त्यांच्या वयाच्या तुलनेत सुदृढ दिसत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी विशेष अभियान हाती घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके म्हणाले की, समाजात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु काही कार्यक्रम समाजाला नवी दिशा देणारे असतात. मदत करणारे अनेक दानशूर लोक समाजात आहेत आणि त्यांची मदत योग्य व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणे अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येक कुटुंबाची प्रगती झाली तर समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल.
Source link
300 विद्यार्थ्यांना 'देवाभाऊ शिष्यवृत्ती' प्रदान:मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'पैशांअभावी शिक्षण थांबत नाही'