Headlines

फडणवीसांची बाईकवरून एन्ट्री, पण PUC ची मुदत संपलेली:काँग्रेसची टीका, खासदार वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे आणली समोर




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वतः केवळ दोन गाड्यांचा ताफा घेऊन प्रवास करत इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला होता. याला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला आणि आपल्या ताफ्यातील ५० टक्के वाहने कमी करण्याचे आदेश दिले. याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही आज दुचाकीवरून विधानभवन गाठले. मात्र मुख्यमंत्री ज्या दुचाकीवरून आले, त्या दुचाकीची पीयूसी संपलेली असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील कागदपत्रे समोर आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही दुचाकी चालवत विधानभवनात दाखल झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी आलिशान गाड्यांऐवजी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या एन्ट्रीची विधानभवन परिसरात मोठी चर्चा झाली. मात्र, विरोधकांनी याला ‘स्टंटबाजी’ म्हणत टीका करण्यास वेळ लावला नाही. पीयूसी एक्स्पायर्डवरून काँग्रेसची टीका मुंबईतील काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या या एन्ट्रीतील मोठी त्रुटी शोधून काढली आहे. ज्या बुलेटवरून मुख्यमंत्री विधानभवनात आले, त्या दुचाकीचे ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ म्हणजेच ‘पीयूसी’ची मुदत संपल्याचे कागदपत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना “राजकारणातील एक्स्पायर्ड माल” असा शब्दप्रयोग केला होता. तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे पीयूसी मुदतबाह्य झालेले होते. मग आता सांगा, ‘एक्स्पायर्ड माल’ चालतो का?” असा सवाल करत, मुंबई आरटीओ आणि मुंबई ट्रॅफिक पोलिस काही कारवाई करणार का? अशी विचारणा वर्षा गायकवाड यांनी केली.

राजकीय आरोप-प्रत्यारोप एकीकडे सत्ताधारी इंधन बचतीचा संदेश देत असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या तांत्रिक चुकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या इंधन बचत मोहिमेवर टीकेची झोड उठली असून, आता गृह विभाग किंवा आरटीओ (RTO) यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *