Headlines

राहुरी:कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करत मेव्हण्याची दुचाकी पेटवली




राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करून, तिच्या भावाची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा नवनाथ मोरे (वय २१, रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती नवनाथ भाऊसाहेब मोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी नवनाथ मोरे हा हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो. २२ जून २०२६ रोजी सायंकाळी नवनाथ मोरे घरातून बाहेर गेले होते. रात्री फिर्यादीचा भाऊ धरम तायडे हा त्यांच्या घरी आला असता, नवनाथ यांनी त्याला फोनवरून शिवीगाळ केल्याचे त्याने बहिणीला सांगितले.यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास नवनाथ मोरे घरी आले. जेवण देण्यासाठी पत्नी बाहेर गेली असता, त्यांनी कोणतेही कारण नसताना पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली आणि तेथून निघून गेले. या प्रकारामुळे कुटुंब भयभीत झाले होते. दरम्यान, पहाटे दोन वाजेच्या सुमारास घराबाहेरून अचानक मोठा आवाज आल्याने नेहा मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिले. त्यावेळी नवनाथ मोरे हे घराबाहेर उभी असलेली मेव्हण्याची ज्युपिटर दुचाकी (एमएच १७ डी.जी.१७५३) पेट्रोल टाकून जाळत असल्याचे स्पष्ट दिसले. नेहा यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेनंतर फिर्यादी नेहा मोरे मुलांसह भावाच्या घरी निघून गेल्या. मात्र, तेथे गेल्यानंतरही आरोपी नवनाथ याने मेव्हण्याला फोन करून पत्नी व मुलांना परत पाठवून दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राहुरी पोलिसांनी आरोपी नवनाथ मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *