Headlines

CBI Raids Latur Tutor Amid NEET Paper Leak Probe


देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सीबीआयच्या (CBI) पथकाने शुक्रवारी पहाटे लातूर शहरातील सुतमील परिसरात एका बड्या खासगी ट्युशन चालकाच्या घरावर छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

.

मुंबईहून हैदराबादमार्गे लातुरात दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आज पहाटे सहा वाजल्यापासून सुतमील भागातील संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी झाडाझडती सुरू केली. या कारवाईत संशयिताचे मोबाईल फोन, संगणकाची हार्ड डिस्क आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची कसून पडताळणी केली जात आहे.

21 जूनला पुन्हा परीक्षा

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून, आता 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. NEET-UG 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर दोन दिवसांनी ही बैठक झाली.

प्रा. कुलकर्णी यांची 12 तास चौकशी

यापूर्वी सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. सलग 12 तास चाललेल्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना पुढील तपासासाठी दिल्लीला नेले आहे. विशेष म्हणजे, प्रा. कुलकर्णी हे मागील चार वर्षांपासून नीटचे पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर होते. यंदा फुटलेल्या पेपरमध्ये बहुतांश प्रश्न ‘केमिस्ट्री’ विषयाचे असून कुलकर्णी हे देखील याच विषयाचे तज्ज्ञ असल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे.

RJD चे राष्ट्रीय सचिव, डॉक्टरसह 4 जणांना अटक

NEET पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली दिल्ली पोलिसांनी एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी NEET उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत होती. या प्रकरणी सूत्रधार आणि एका डॉक्टरसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींपैकी एक राजदचे राष्ट्रीय सचिव संतोष कुमार जयस्वाल देखील आहेत. जयस्वाल हा संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार (किंगपिन) असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.तो मुलांना आणि त्यांच्या पालकांना मेडिकल कॉलेजमध्ये 20-30 लाखांत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. संतोष कुमार जयस्वाल हे लालू यादव आणि तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *