Headlines

माती-पाणी संवर्धनासाठी हजारो नागरिक चालले:छत्रपती संभाजीनगरमध्ये महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद




छत्रपती संभाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. ‘माती आणि पाणी’ संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या मार्गावर ही जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत १५ तारखेपासून मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून शहरात ‘महावॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद सदस्य आ. सुहास शिरसाट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, मनपा आयुक्त अमोल येडगे, वाल्मीचे महासंचालक सुनिल कुशिरे, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, कार्यकारी अभियंता सिंचन विजय बिडगर, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, उप अभियंता विजय कांबळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, क्रीडाप्रेमी नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन झाली. त्यानंतर क्रांती चौकातून पदयात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा पैठण गेट, तिलकपथ रोड, पोलीस चौकी, गुलमंडी मार्गे महात्मा फुले पुतळा ते जिल्हा परिषद मैदान येथे पोहोचली. जिल्हा परिषद मैदानावर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप करण्यात आला आणि पुन्हा शपथ देण्यात आली. समारोपाच्या ठिकाणी आ. सुहास शिरसाट व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. या वॉकेथॉन स्पर्धेत सोडतद्वारे घोषित करण्यात आलेल्या विजेत्यांची नावे नंदिनी अशोक साळवे, मोहन कारभारी आखाडे, सचिन सुभाष जाधव, निखिल तुळशीराम पठाडे, संदीप भरत गिरी, समृद्धी रमेश बागुल आणि अनिता सुरेश खेळकर अशी आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *