![]()
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेतीतील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील पोषक घटक नाहीसे होत आहेत. त्यामुळे आता खत वापरूनही उत्पादनात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे बळीराजा आता पुन्हा एकदा सेंद्रिय खतांकडे वळू लागला आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांची झपाट्याने वाढ होते. मात्र, जमिनीची पोत घसरते. सुपीकता नष्ट होण्यास सुरुवात होते. हवामान बदलामुळे पुरेसा पाऊस पडला नाही तर पिकाच्या वाढीसाठी टाकलेले रासायनिक खत पुढील वर्षीही तसेच राहते. त्यामुळे शेतीची पोत सुधारण्यासाठी बहुतांश शेतकरी पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळताना दिसत आहेत. मात्र, पशुधनात होणारी घट आणि शेणखताचा तुटवडा यामुळे शेणखताचे भाव चांगलेच वाढले आहेत. शेतकऱ्यांना एक ट्रॅक्टर-ट्रॉली शेणखतासाठी ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागतात, असे देवळी येथील शेतकरी एकनाथ पाटील तायडे यांनी सांगितले. तालुक्यातील शिल्लेगाव, लासूर स्टेशन, सावंगीसह लासूरगाव ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. देवळी, शिरेगाव, लासूर स्टेशन, सावंगी, माळीवाडगाव, गाजगावसह ग्रामीण भागात बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आता पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे शेतजमिनीत शेणखताचा वापर वाढताना दिसत आहे. शेणखताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे शेणखताला सोन्याचे दिवस आले आहेत. सर्वच शेतकरी शेतजमिनीची पोत सुधारण्यासाठी याचा वापर करत आहेत. शेणखताच्या वापराने शेतातून मिळालेले उत्पादनही शरीराला पोषक ठरते. शेणखताचा शेतीत वापर केल्याने मानवी आरोग्य निरोगी राहते. हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे शेतकरी आता आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून आरोग्य पत्रिका तयार करताना दिसत आहेत. लेंडी खत फायदेशीर, शेणखत वाढवते उत्पादन रासायनिक खतापेक्षा शेणखत सरस आहे. याचा कोणताही दुष्परिणाम पिकावर व जमिनीवर होत नाही. जमिनीची सुपीकता टिकुन राहते व पोत सुधारते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. एकदा जमिनीत शेणखत टाकल्यावर तीन वर्ष त्याचा परिणाम दिसुन येतो. यामुळे गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव, लासूर स्टेशन माळीवाडगाव, गाजगाव, गवळीशिवरा, फुलशिवरा सावंगीसह आदी परिसरातील शेतकरी शेणखत खरेदीसाठी धावपळ करत आहेत. शेणखता बरोबरच लेंडी खताचे मोठे महत्व आहेत.
Source link
शेतकरी देतायत सेंद्रिय शेतीला पसंती; शेणखतावर अधिक भर:लासूर स्टेशन येथे शेणखताला मागणी; सहा हजारांत ट्रॉलीभर खत