Headlines

उल्हासनगरात महिलेची चपलांचा हार घालून धिंड:रोहित पवारांचा संताप; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी




उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात गत 14 तारखेला मंदिर प्रवेशाच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेली चपलांचा हार धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. समतेच्या ज्योत पेटवणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील, तर हे आपल्या सर्वांचे अपयशच आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी साक्री तालुक्यात भोंदूबाबाने दोघांची हत्या केल्याच्या घटनेवरून सरकारवरही टीका केली. उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी व हडकमाता चौक परिसरात गत गुरुवारी एका 50 वर्षीय महिलेची व तिच्या कुटुंबियांची बेदम मारहाण करून धिंड काढण्यात आली. या घटनेत फिर्यादी महिला, त्यांची बहीण व मुलगी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, जुली वाघरी, विष्णू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू वाघरी, महेश वाघरी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना वाद व मंदिर प्रवेशाच्या कारणावरून या आरोपींनी पीडित महिला व तिच्या कुटुंबियांची धिंड काढल्याचा आरोप आहे. आपली वाटचाल प्रतिगामीत्वाकडे तर होत नाही ना? आमदार रोहित पवार या घटनेवर संताप व्यक्त करताना म्हणाले, मंदिरात प्रवेश केल्याच्या रागातून महिलेला मारहाण करुन, तिचे केस कापून आणि चपलाचा हार घालून भर रस्त्यात धिंड काढल्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समतेची ज्योत पेटवणाऱ्या महाराष्ट्रातील उल्हासनगरात घडत असेल तर आज हे आपल्या प्रत्येकाचंच अपयश आहे. याच महाराष्ट्रात स्त्रीचा गौरव केला गेला तिथंच भर रस्त्यात असा अन्याय-अत्याचार होत असेल तर आपली वाटचाल प्रतिगामीत्वाकडं तर होत नाही ना? याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. एकीकडं माणूस अंतराळात जात असताना दुसऱ्या बाजूला मंदिरात जाण्यापासून रोखलं जातं, हे योग्य नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनीही या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. साक्री तालुक्यात भोंदूबाबाने केला दोघांचा खून रोहित पवारांनी धुळ्याच्या साक्री तालुक्यात भोंदूबाबाने शनी अमावस्येच्या रात्री पूजेसाठी आलेल्या दोन तरुण-तरुणींचा खून केल्याच्या घटनेवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, शनि अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी साक्री तालुक्यातील जैताने येथील भोंदूबाबा अशोक खैरनार याच्या आश्रमात गेलेल्या तरुण-तरुणीचा भोंदूबाबाने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.. पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली ही भोंदूंची कीड समूळ नष्ट करण्यासाठी सरकार मात्र कोणतंही पाऊल उचलताना दिसत नाही. आज राज्यात स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नांतून झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली असती आणि शक्ती कायद्यासारखा कठोर कायदा असता आणि त्यानुसार आजवरच्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळाली असती तर महिलांचे असे खून करण्यापर्यंत भोंदूंची मजल गेली नसती. त्यामुळंच सरकारने तातडीने कठोर असा शक्ती कायदा आणावा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचीही कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *