Headlines

खडकवासल्यात भरधाव मोटारीच्या धडकेत 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:दुचाकीस्वार पालक जखमी; मद्यपी चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या दिले ताब्यात




खडकवासला परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बालकाचे दुचाकीस्वार वडील आणि आई जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपी मोटारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, नांदेड सिटी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत्यू झालेल्या बालकाचे नाव यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा. धायरी) असे आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये त्याचे वडील नीलेश कांबळे (वय ३६) आणि आई यांचा समावेश आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३६, रा. अहिल्यानगर) या मद्यपी मोटारचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश कांबळे हे भाजीपाला विक्रेते असून, नऱ्हे भागात व्यवसाय करतात. ते त्यांची पत्नी आणि मुलगा यशराज यांच्यासह खडकवासल्याहून पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. खडकवासला भाजी मंडई परिसरात भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक दिल्यानंतर याच मोटारीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या इतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही धडक दिली. अपघात घडवून मोटारचालक अमोल घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अपघातानंतर खडकवासला भाजी मंडई परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी पाठलाग करून मोटारचालक अमोलला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या यशराजसह त्याच्या आई-वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यशराजचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. कसबे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी मोटारचालक अमोल याने मद्यपान केले असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *