![]()
अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. यामुळे ग्रामीण स्वच्छता सुधारण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल. घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आणि महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रत्येकी ३ लाख रुपये किमतीच्या या ई-रिक्षांसाठी एकूण ७८ लाख रुपयांचा निधी १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. पारंपरिक डिझेल वाहनांच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे. पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेने निवड केलेल्या २६ गावांमध्ये अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर व लोणटेक; अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व रासेगाव; अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे व खानमपूर पांढरी; भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा शंभू; चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा; चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व कवठा कडू; दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद व थिलोरी; मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ व धानोरा गुरव; तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी; वरुड तालुक्यातील हातुर्णा व शहापूर; धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट बु.; धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोडा व काटकुंभ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
Source link
26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या