![]()
‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण विद्यार्थ्यांच्या साथीने सुरू झालेल्या या उपक्रमाने आता ४०० आठवड्यांचा मोठा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा काळ वगळता, दर रविवारी नित्यनेमाने २ तास एकत्र येत या चळवळीने आता ४०१ व्या आठवड्यात उत्साहात पदार्पण केले आहे. नुकतीच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या (बांधकाम भवन) परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. १०० ट्रक कचरा हटवला, बिल्डरांचीही मिळाली साथ विशिष्ट उद्दिष्ट ठेवून राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचे दृश्य परिणाम शहरात दिसत आहेत. याअंतर्गत केवळ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून तब्बल १०० ट्रक कचरा हटवण्यात आला आहे. घाटी रुग्णालय, विविध शासकीय कार्यालये आणि उद्यानांची स्वच्छता करून तेथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यात स्थानिक बांधकाम व्यावसायिकांचाही मोठा वाटा असून, त्यांनी कचरा उचलण्यासाठी स्वतःहून ट्रॅक्टर आणि जे.सी.बी. सारखी यंत्रसामग्री विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. डाॅक्टर, वकील अन् ८७ वर्षांचे निवृत्त अधिकारीही सहभागी या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ तरुण किंवा विद्यार्थीच नाहीत, तर समाजातील नामांकित डॉक्टर, वकील, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि चक्क ८७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरतात. उच्चपदस्थ अधिकारी जेव्हा स्वतःचे पद बाजूला ठेवून श्रमदान करतात, तेव्हा संपूर्ण शहराला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. या कृतीतून ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शहराविषयी आपुलकी निर्माण होऊन त्यांच्यात ‘श्रमसंस्कृती’ रुजवण्यात मोठे यश आले आहे. श्रमदानातून सामाजिक बांधिलकी “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात या रविवारी मोहीम उत्साहात पार पडली. आपण जिथे रोज आठ तास काम करतो, तो परिसर स्वच्छ आणि सुंदर असेल तर कामाची ऊर्जा व कार्यक्षमता आपोआपच दुप्पट होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेपुरते मर्यादित न राहता, श्रमदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा घेतलेला हा वसा प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.” – अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग
Source link
संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा