![]()
आंदोलने आणि चळवळी उभ्या करणारा, स्वतःच्या हक्कांसाठी लढणारा मध्यमवर्ग आता स्वतःच्या कोशात जगू लागला आहे. यामुळे संस्थात्मक कार्यासाठी आणि चळवळींसाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा ठप्प झाला असून, मध्यमवर्गाची ही आत्ममग्नता चिंताजनक आहे, असे मत प्रसिद्ध लेखक
.
कै. कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित १९ व्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी सोहम ट्रस्टच्या माध्यमातून भिकाऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरणारे डॉ. अभिजित सोनावणे यांना ‘समाजशिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, पॅकेजिंग मशिन्सच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘इंटेरपॅक मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संचालक हिमांशू इंगळे यांना ‘अनुकरणीय उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. मनीषा सोनावणे आणि हिमांशू इंगळे उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह आणि ४० हजार रुपये असे आहे.
प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर कर्जाच्या रूपाने आर्थिक समृद्धी आली असली तरी, समाजाचा मूल्यविवेक हरवल्यामुळे चंगळवाद वाढला आणि संवेदनशीलता कमी झाली. पूर्वी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते, पण आज ते राहिलेले नाहीत.
अन्नामुळे कुपोषित झालेला समाज जसा अपेक्षित नाही, तसाच स्वत्व आणि सत्व हरवल्यामुळे भावनिक दृष्ट्या कुपोषित होत चाललेला असंवेदनशील समाजही अपेक्षित नाही. एकीकडे भौतिक संपन्नतेचा भास निर्माण केला जात असला तरी, दुसरीकडे किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आहे.
समाजातील उच्चभ्रू वर्गाला स्वतःच्या प्रतिष्ठेच्या कल्पना जपण्यात अधिक रस आहे, त्यांच्या दुष्कृत्यांनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. समाजाचा आर्थिक दृष्ट्या जो खालचा स्तर आहे, त्याची लढाई जगण्याशी आहे, तर मध्यमवर्ग आत्मतुष्ट आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असे चित्र अपेक्षित असताना, माणसांची गर्दी असे चित्र दिसते, असेही जोशी यांनी नमूद केले.
याची कारणे मानसशास्त्रात सापडणार नाहीत, तर ती समाज व्यवहारात शोधावी लागतील. सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण सध्या वेळेच्या बदल्यात किती पैसे मिळतील याचे गणित मांडले जाते. या मानसिकतेमुळे संस्थात्मक कार्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.