![]()
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी थेट मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात बोलताना प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, विधान परिषदेची कोणती जागा कोणता पक्ष लढवणार, याचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मात्र, नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली असल्याने ही जागा आमच्या पक्षाला मिळावी, अशी मागणी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडे संधी मागणे हे आमचे कामच आहे. अमर राजूरकरांच्या उमेदवारीवर भाष्य काँग्रेसमधून नेमकेच भाजपमध्ये आलेले अमर राजूरकर हे पुन्हा विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत. यावर बोलताना चिखलीकर म्हणाले की, कोणत्याही पक्षातून कोणीही उमेदवारी मागणे गैर नाही. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांसाठी अंतिम असेल. संपूर्ण महाराष्ट्रात संख्याबळाचा विचार केला तर वेगवेगळ्या पक्षांची ताकद कमी-जास्त आहे, पण महायुती म्हणून निवडणूक लढवताना फक्त मतदारसंघांचे वाटप करावे लागेल. पक्षात कोणतीही धुसफूस नाही महायुती एकूण 17 पैकी किती जागा लढवणार, हे नेत्यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल असे सांगत चिखलीकर यांनी पक्षात कोणत्याही वादाचे वृत्त फेटाळून लावले. आमच्या पक्षात कोणतीही धुसफूस किंवा नाराजी नाही. काही अडचण असेल तर एकत्र बसून चर्चा करू, असे सुनेत्रा पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. आमचा पक्ष पूर्ण ताकदीने सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदारांना मुंबईला बोलावले नाही प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी आमदार नेहमीच मुंबईला जात असतात. विशेषतः कॅबिनेट बैठकीच्या दिवशी सर्व मंत्री उपलब्ध असल्याने कामे करून घेणे सोपे जाते, म्हणूनच लोकप्रतिनिधी मुंबईत आले असून त्यांना कोणीही खास बोलावलेले नाही
Source link
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच:नांदेडची जागा राष्ट्रवादीला मिळावी; आमदार चिखलीकरांची सीएम फडणवीस, सुनेत्रा पवारांकडे मागणी