Headlines

छोट्याशा गावात जावे आणि तिथेच चार खांदे शोधावेत:शहरातील भिंती आता कबरी झाल्यात, कुणाची कबर मोठी हा प्रश्न – नाना पाटेकर




शहरातील भिंती आता मला कबरी वाटत आहेत. तुझी कबर किती मोठी? हजार फुटांची आहे का? माझी दोन हजार फुटांची आहे. त्याची चार हजार, पाच हजार. वाटते एखाद्या छोट्याशा खेड्यात जावे आणि तिथेच स्वतःचे चार खांदे शोधावेत, अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या स्थितीवर आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. नागपुरात सोमवारी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात जलक्रांती परिषद झाली. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी खेड्याच्या ओढीची उपरोक्त भावना व्यक्त केली. ते म्हणाले, गावखेड्यात गेल्यानंतर आपल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल, तर आपल्याला आणखी काय हवे? तेवढीच एक अपेक्षा आहे. नाटकात काम करत होतो तेव्हा दोन वेळच्या खाण्याचीही माझी भ्रांत होती. मला श्रीमंत मंडळींमध्ये वावरणे जमत नाही. मी शहरांत राहू शकत नाही. मी गाव किंवा खेड्यात राहतो. माझ्याकडे 10-12 गायी आहेत. पाच पंचवीस कुत्रे आहेत. 12-14 एकर शेत आहे. मी तिथे उगवलेलेच खातो. आता त्या शेतात काही उगवले नाही की मला त्रास होतो. त्या त्रासातून मला कोरडवाहू शेतकऱ्यांचा त्रास लक्षात येतो. नाना पाटेकर म्हणाले, आम्ही आनंद मिळावा म्हणून सगळ्या गोष्टी करतो. पण मला आता शहरातील भिंती कबरी वाटू लागल्यात. तुझी कबर किती मोठी. हजार फुटांची आहे का. माझी दोन हजार फुटांची आहे. त्याची चार हजार, पाच हजार फुटांची. तेथील आभाळही खिडकीएवढेच छोटेशे. मुंबईल्या मित्रांना मी विचारतो, गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस. ते म्हणतात आम्हाला वेळच मिळाला नाही. कारण, मी, माझे खर व घरातील 4 मंडळी यापलिकडे विचारच होत नाही. नाटक – सिनेमातून मिळणारा सन्मान, पैसे यापेक्षा जास्त मला ‘नाम’मुळे सन्मान मिळाला. खेड्यात जावे आणि तिथेच चार खांदे शोधावेत नाना पाटेकर पुढे म्हणाले, मरणावर विश्वास ठेवला की, जगणे खूप छान आहे. फक्त संचय करत राहतात. पण आपल्या जन्मल्यापासून श्वास घेतोय, देवाने निसर्गाने आपल्याकडे त्याचा एक रुपयाही मागितला नाही. त्यामुळे निसर्ग चांगला ठेवणे आपली जबाबदारी आहे. माझ्या घरात आम्ही 7 भावंडं होतो. सगळी गेली. मी एकटाच राहिलो. आई नाही. वडील नाहीत. माझ्या बरोबरीचे कुणीच नाही. पाठीवर हात फिरवणारा कुणी नाही. त्यामुळे गावात गेल्यानंतर वयोवृद्ध माणसाने गालावर हात फिरवला की, आई-वडील भेटल्याचे वाटते. आपण फार तसे सुदैवी व दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात, पण ती क्षणित जाणिव होते. मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. एखादे छोटेसे गाव घ्यावे त्याचेच काहीतरी करावे आणि तिथेच आपले चार खांदे शोधावेत असे वाटते. अशा वेगवेगळ्या विचित्र आनंदाच्या कल्पना आहेत, असे ते म्हणाले. तुमची पात्रता काय त्यावर आपली जात ठरते नाना पाटेकर यांनी यावेळी आपल्या आईचा दाखला देत हिंदू व मुसलमान यांच्यातील फरक समजावून सांगितला. ते म्हणाले, मी आईला विचारायचो की, हिंदू व मुसलमान यांच्यातील फरक काय? ती म्हणायची काही नाही. आपण हात जोडून नमस्कार करतो आणि ते हात उघडून नमस्कार करतात. आम्हाला हे शिकवले गेले. आमच्यावर असे संस्कार झाले. जात कधीही संपणार नाही. पण तुमची पात्रता काय त्यावर आपली जात ठरते. मी कधीही कुणाला जात – धर्म विचारला नाही. मलाही कुणी माझी जात विचारली नाही. मी सुद्धा कुणाला सांगितली नाही. मी तुम्हाला काय देतो व कशी कला सादर करतो हेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *