![]()
पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट भरती रॅकेट चालवून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. एका विद्यार्थ्याकडून तब्बल ४५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या रॅकेटमध्ये बनावट नियुक्तीपत्रे, वर्क ऑर्डर, ट्रेनिंग लेटर तसेच पालिकेचे बनावट शिक्के आणि लोगो वापरून उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात आला. ‘पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यात सहभागी आहेत,’ असे सांगून उमेदवारांची दिशाभूल केली जात होती. पालिकेजवळील रेस्टॉरंटमध्ये मुलाखती घेऊन ही भरती अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. फसवणूक करणाऱ्यांनी बनावट कर्मचारी उभे करून त्यांच्या नावाने खोट्या पगार पावत्याही तयार केल्या. पैसे परत मागणाऱ्या उमेदवारांना ‘नोकरी लागली’ किंवा ‘कायम झाले’ अशी खोटी कागदपत्रे दिली गेली. काही उमेदवारांना दिलेले धनादेश (चेक) देखील वटले नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पालिकेतील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी संबंधित प्रकरणाची तक्रार आयुक्त आणि पोलीस यंत्रणेकडे करण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोपही कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार यांनी या प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. बनावट कागदपत्रांची फॉरेन्सिक तपासणी, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी, तसेच पीडितांची यादी जाहीर करून त्यांचे जबाब नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली. दोषींवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी चिन्हांचा गैरवापर आणि संघटित गुन्हेगारी अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ही केवळ आर्थिक फसवणूक नसून बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर आणि शासन व्यवस्थेवरील विश्वासावर झालेला गंभीर आघात असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.
Source link
पुणे महापालिकेच्या नावाने बनावट भरती रॅकेट उघड:कोट्यवधींची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशीची मागणी