![]()
बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. अपघातग्रस्त मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बार्शी येरमाळा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर लेखी आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी पिंपळवाडी बसस्थानकाजवळ दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. “अजून किती बळी जाणार? प्रशासनाला जाग कधी येणार?” अशा घोषणा देत वाहतूक रोखून धरण्यात आली. पिंपळवाडी गावातून जाणारा हा राज्यमार्ग वर्दळीचा आहे. गावाची वस्ती, शाळा, मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यालगतच असल्याने नागरिकांना वारंवार रस्ता ओलांडावा लागतो. मात्र एकही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जातात. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी ८ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. गतिरोधक बसवावेत, वेगमर्यादेचे फलक लावावेत व वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वारंवार केली. मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कार्यवाही झाली नसल्याचा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मार्गावर प्रत्येक अपघातानंतर संबंधित विभागाचे अधिकारी येतात, केवळ औपचारिकता म्हणून पाहणी करतात, ग्रामस्थांच्या रोषाला शांत करण्यासाठी तात्पुरते आश्वासन देतात आणि निघून जातात. यावेळी आंदोलनामुळे प्रशासनाने ‘लेखी’ पत्र देण्याची तसदी घेतली. ग्रामस्थांचा आरोप आहे. गतिरोधकासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक अपघातानंतर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. तातडीने गतिरोधक न बसवल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. भीषण धडकेनंतर दुचाकीस्वार फरार; दोन वर्षांत ८ जणांचा मृत्यू सोमवारी सायंकाळी आविदा चौधरी रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. पांगरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
Source link
पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी