![]()
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ पुण्यात भव्य ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’ काढण्यात आला. सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नसून तो भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, असे मत छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. एनसीईआरटीने हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही एनसीईआरटीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून दैदीप्यमान इतिहासाला लपवण्याचा आणि विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती घराण्यासह संपूर्ण महाराष्ट्राकडून आपण या कृतीचा निषेध करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. तसेच, मराठा साम्राज्याच्या नकाशाची पाठ्यपुस्तकात पुनर्स्थापना होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात इतिहास संशोधक, अभ्यासक, विविध संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Source link
एनसीईआरटी पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करण्यासाठी मोर्चा:महाराष्ट्र भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय- छत्रपती वृषाली राजे भोसले