![]()
प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही. शिवसेनेच्या (उबाठा) पुढाकाराने झालेल्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. अखेर अभियंत्यांनी सोमवारपासून कामाची प्रक्रिया सुरू करुन आणखी टँकरने पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिली. आश्वासन मिळाल्यानंतरच अभियंत्यांना परत जाऊ देण्यात आले. सूर्य आग ओकत असून पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या हद्दवाढ भागात सर्वाधिक आहे. गुडधीसह परिसरातील रमेश नगर, श्रीराम नगर, रूख्मिणी नगर, गणेश नगर, देशमुख कॉलनी, चक्रधर कॉलनी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपाच्या जलप्रदाय विभागाकडे निवेदने देऊन तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र अनेक महिन्यांपासून अत्यंत अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला. २२ मे रोजी गुडधी रोडवरच महिला व शिवसैनिकांनी आंदोलन केले. याठिकाणी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांच्यासह अन्य अभियंता आले. त्यांच्याशी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, त्या भागातील नगरसेवक अभय खुमकर, ज्ञानेश्वर गावंडे यांच्यासह परिसरातील नागरीकांनी चर्चा केली. पाण्याचा पत्ता नाही अन् नागरिकांना आली देयके भरमसाठ परिसरात नळाला पाणीच नियमित येत नाही. मात्र तरीही सन २०१९ते आतापर्यंतचे पाण्याचे देयक आम्हाला का देण्यात आले, असा सवाल नागरिकांनी अभियंत्यांना केला. सहा वर्षांची देयके एकाच वेळी देण्यात आली. ही देयक ९ ते १७ हजारांपर्यंत होती. मात्र पाणीच मिळत नसल्याचे पाणी कर का द्यावा, असा सवालही नागरिकांनी केला. या भागात मजूर वर्ग, मध्यमवर्गीय राहत असून त्यांना ही देयके न परवडणारी असल्याचे नागरिक म्हणाले. ४० लाखांचा निधी मंजूर, निविदा उघडल्याच नाहीत पाइप लाइनसह अन्य कामासाठी ४० लाखाचा निधी मंजूर आहे. यासाठी निविदाही बोलावण्यात आल्या. मात्र निविदा उघडण्यात आल्या नाहीत. हे काम कोणत्या लेखाशीर्षाखाली करायचे, हा निर्णयच काही दिवस झाला नाही. यावर ठिय्या आंदोलनात शिवसेनेच्या नेत्यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. हा मुद्दा प्रशासनाच्या आधीच लक्षात येणे आवश्यक होते, असे म्हणत या तांत्रिक मुद्याशी नागरिकांचा संबंध नसून, पाणी केव्हापासून मिळेल, हे सांगा अशा शब्दात खडसावले. सरकारी यंत्रणांकडे निवेदनाचा पाऊस तरी उपाय नाहीत पाण्यासाठी नागरिकांनी सरकारी यंत्रणांकडे निवेदनांचा पाऊस पाडला. तापमानात वाढ झाल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे, असे नागरिक आंदोलनादरम्यान म्हणाले. मात्र अशा परिस्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील अनेक कुटुंबांना खासगी टँकर किंवा विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पाण्यावरून घेरण्याचा प्रयत्न महापालिकेत नगरसेवक निवडून चार महिने होत नाही तोच वंचित बहुजन आघाडीने २४ एप्रिल रोजी मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर मलकापूर-शिवणी परिसरात टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला. उमरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या कामाची निविदा अद्यापही अंतिम झाली नसून, हे लाडके कंत्राटदार कोणाचे आहेत, असा सवाल शिवसेनेचे (उबाठा) अभय खुमकर यांनी १२ मे रोजी झालेल्या मनपाच्या सभेत केला होता. यावर सभापती विजय अग्रवाल यांनीही कोण लाडका, असा प्रतीप्रश्न केला होता. मनपा निवडणुकीत उबाठाचे सहा नगरसेवक िवजयी झाले होते. अर्थात त्यापैकी नंतर चार नगरसेवक शिंदे गटात गेले. मात्र त्यापैकी ५ जण विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघात येतात. तसेच उमरी भागातच माजी महापौर, भाजप महानगराध्यक्ष राहतात. सर्वाधिक याच भागातील समस्यांवर शिवसेना व वंचितने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी काळात पूर्वमधील पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांवरुन राजकीय घमासान होण्याचे संकेत या आंदोलनातून मिळाले आहे. हापसून पहा; पाणी येत नाही आंदोलनानंतर महिलांनी गुडधी येथील एका गल्लीतील नादुुरुस्त हँडपंपाजवळ अभियंत्यांना नेले. काही वेळ हापसूनही पाणीच आले नाही. पंपात पाइपच नसून पाणी कसे येईल, असे युवक म्हणाले. अन्य दोन ठिकाणीच्या हँडपंपांचीही अशीच स्थिती होती. यावर भूजल पातळीच खोल गेल्याचे अभियंते म्हणाले. मात्र त्यांनी हँडपंप सुरू होण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. पाइप नेले फार्महाऊसवर पाणी पुरवठा विभागाने पाइप लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले असून पाइप मात्र फार्महाऊसवर नेण्याचा आरोप युवकांनी केला. काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत असताना गुडधी भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी कारवाईची मागणीही त्यांनी केली. पिण्याच्या पाण्याअभावी स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत असून त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी नमूद केले. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही नागरिकांनी दिला.
Source link
पाणी पेटले!:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार