Headlines

पालघरमध्ये एसीबीची मोठी कारवाई:45 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल महिला अधिकारी रंगेहात जाळ्यात; नवी मुंबईतही मोठी कारवाई




राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई सुरू ठेवत शिपायापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या या कारवाईचा धाक निर्माण झाला असला, तरी लाचखोरीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून, पालघर एसीबीने पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. या ताज्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक 13/03 मधील जागेवर केलेल्या माती भरणीचा आणि रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी उज्वला पाटील यांनी तब्बल 1 लाख 95 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात माती भरणीच्या पंचनाम्यासाठी दीड लाख, तर रूम बांधकामाचा पंचनामा टाळण्यासाठी 45 हजार रुपये मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबतची तक्रार प्राप्त होताच एसीबीने शिताफीने सापळा रचला आणि 45 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना उज्वला पाटील यांना रंगेहात जेरबंद केले. याप्रकरणी सध्या पेल्हार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नवी मुंबईत मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अवघ्या 10 दिवसांपूर्वीच नवी मुंबईत एक मोठी कारवाई करत, सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22 हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या कार्यालयातच रंगेहात अटक केली. अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील बड्या अधिकाऱ्याला थेट कार्यालयातच अटक झाल्याने सिडकोसह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबई एसीबीच्या या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *