![]()
चांदूर बाजार येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सागर भामरे यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानासमोर समाजहितासाठी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन केले आहे. नगरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष मनीषा नागलिया, उपाध्यक्ष शेख रहमान शेख इब्राहिम आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे मंचावर उपस्थित होते. ठाणेदार भामरे यांनी त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या विविध घटनांची आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवायांची माहिती उपस्थितांना दिली. “एक सीसीटीव्ही कॅमेरा समाजासाठी” ही संकल्पना राबविल्यास चोरी, मारामारी, वाहतूक नियमभंग यांसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एखादी घटना घडल्यानंतर तपास कार्यात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर कॅमेरा बसवणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळातही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात येणार असून, यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला नगरसेवक, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक, पोलीस पाटील, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनीही बैठकीला मार्गदर्शन केले.
Source link
प्रत्येक दुकानदाराने समाजासाठी एक CCTV कॅमेरा लावावा:ठाणेदार सागर भामरे यांचे शांतता समिती बैठकीत आवाहन