![]()
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत
.
जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या दोन्ही पिकांना ठोस पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी आजही त्यांच्यावर अवलंबून आहेत. महागाई उच्चांक गाठत असताना सोयाबीन आणि कपाशी शेतकरी विकतो, तेव्हा बाजारात मातीमोल भाव मिळतो. त्यातच सोयाबीनच्या उत्पादकतेत यंदा मोठी घट झाली आहे. नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चात वाढ, अपेक्षित बाजारभाव न मिळणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील दुसरे पीक घेण्यासाठी आर्थिक आधार देणारे मानले जाते. मात्र, सोयाबीनमधील सततची घट शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत आहे.
खतांचा तुटवडा; डिझेलअभावीही चिंता खरीप पेरणीस केवळ तीन ते चार आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी आतापासूनच बियाणे आणि रासायनिक खतांची खरेदी करत आहेत. मात्र, यंदा बाजारात मागणी असलेल्या डीएपी आणि युरिया या खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ही खते अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. दुसरीकडे, शासनाकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कितपत परवडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच ग्रामीण भागातील काही ठिकाणी डिझेलचाही पुरेसा साठा नाही.
मक्याच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित ^यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कापूस, तूर आणि मका पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. – राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी.
पाच वर्षांपासून सोयाबीनमध्ये सातत्याने सतत होते नापिकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थचक्राचा मुख्य आधार आजही खरीप हंगामच आहे. मात्र, खरीपात सोयाबीन आणि कपाशी याशिवाय तिसरा प्रभावी पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही. मागील पाच-सहा वर्षांपासून सोयाबीनमध्ये सातत्याने नापिकी होत आहे. कपाशी मजूर टंचाई, वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत हवामान परिस्थितीनुसार सोयाबीनला पर्यायी पिकांवर प्रभावी संशोधन करणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देणेही गरजेचे होते. मात्र, या बाबतीत प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसून येते.