![]()
“स्वच्छ नदी, हरित भविष्य व समृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित चांदूर येथे प्रथमच गावकऱ्यांच्या श्रमदानावर आधारित मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा रविवारी श्रीगणेशा झाला. या अभियानात संपूर्ण गाव, स्वयंसेवी संस्था, संघटना सहभागी होऊन नदी परिसर स्वच्छ करणार अ
.
जिल्ह्यात मोर्णा नदी ही एक प्रमुख नदी मानली जाते. चांदूर परिसरातून ती पुढे जाते. मात्र अलीकडे या नदीत घाण, कचरा व अनावश्यक वनस्पती साचल्यामुळे नदीचे वैभव नष्ट होत आहे. नदी स्वच्छतेचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. त्यामुळे आता नदी स्वच्छता अभियान श्रमदानातून राबवण्यात येत आहे. रविवारी अभियानाला प्रारंभ झाला.
लोकसहभाग असल्याशिवाय कोणती योजना यशस्वी होऊ शकत नाही, असे आमदार रणधीर सावरकर याप्रसंगी म्हणाले. सरकारने केलेल्या कामामध्ये प्रत्येकाचे योगदान असणे ही आपली संस्कृती आहे. मानवतेच्या भावनेतून मोर्णा नदी स्वच्छता अभियान सुरू करून चांदूर येथील युवकांनी एक आदर्श निर्माण केला, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, ग्रा.पं. प्रशासक वैभव माहोरे, राजेश लुंगे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, गटविकास अधिकारी प्रमा पटोकार, खदानचे ठाणेदार मनोज केदारे, संजय कोरडे, वासुदेवराव टिकार, लखुआप्पा लंगोटे, देविदास बोदडे, संजय माहोरे, आदी होते.
अनेकांचा सहभाग : नदी स्वच्छता अभियान हा उपक्रम सातत्याने लोकसहभागातून सुरू राहणार आहे. यात अनेक मंडळे व दानशूर व्यक्तींचे सहकार्यही मिळत आहे. नदी स्वच्छता अभियानानंतर नदी खोलीकरण केले जाणार आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम कार्यान्वित करण्याचा मानस आहे. यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा व हिरवे अकोला ही संकल्पना परिसरात दृढ होऊ शकेल. नदी स्वच्छता अभियानात संपूर्ण गावकरी, स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दोस्ती ग्रुपचा वाटा नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ हा मूळमंत्र आत्मसात करून या अनुषंगाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत श्रमदान व लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता अभियान कार्यक्रम साकार करण्यात आला. यात गावातील दोस्ती ग्रुपचा सिंहाचा वाटा असून ५ हजार लोकसंख्येच्या गावात जुने मित्र एकत्र येऊन त्यांनी गावाच्या विकासासाठी हा उपक्रम साकार केला.