![]()
विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासमोरील मोर्शी-सिंभोरा-आष्टी राज्य महामार्गावरील वर्धा नदीवरील जुन्या पुलाऐवजी नवीन उंच पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत ३५ कोटी रुपयांच्या निधीस म
.
या पुलामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांची अनेक दशकांपासूनची वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार असून अप्पर वर्धा धरणाच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
मोर्शी-सिंभोरा-आष्टी या राज्य महामार्गावरील हा पूल अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख दळणवळणाचा दुवा आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच मालवाहतूक करणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या पुलाचे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या पुलासाठी आवश्यक आराखडे व तांत्रिक डिझाइन तयार केले असून सध्या जलसंपदा विभागाकडून आवश्यक परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी मिळाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ केला जाणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेला पूल अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आला असून कालांतराने त्याची संरचनात्मक क्षमता कमी झाली आहे. वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण लक्षात घेता हा पूल आजच्या गरजांसाठी अपुरा ठरत आहे.
विशेष म्हणजे, पावसाळ्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यावेळी नदीची पाणीपातळी वाढून हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील वाहतूक पूर्णतः ठप्प होते. याचा मोठा फटका नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना बसतो.
मंजूरी झाली प्राप्त अप्पर वर्धा धरणाच्या समोरील मोर्शी ते आष्टी मागाार्वरील पुलाच्या बांधकामाला शासनाची मंजुरात प्राप्त झाली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी प्राप्त होताच निविदा प्रक्रिया व इतरही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. – संजय बोडखे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मोर्शी.