Headlines

आप्तजनांपेक्षा मोबाईल प्रिय झाल्यानेच समाजात दु:ख वाढले- रेवतीनंदन दास:अहिल्यानगरात इस्कॉनच्या श्रीमद् भागवत कथेचा थाटात शुभारंभ‎




परिवारातील आप्तजनांपेक्षा आजच्या पिढीला मोबाईल अधिक प्रिय झाल्यानेच मानवी जीवनातील वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख वाढत चालले आहे, असे परखड प्रतिपादन पुणे येथील “इस्कॉन’ मंदिराचे ज्येष्ठ ब्रम्हचारी रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते मुख्य निरूपणकार म्हणून बोलत होते. सोहळ्याचे उद्‌घाटन महापौर ज्योतीताई गाडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते राधा-कृष्ण विग्रह पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर इस्कॉनचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, नेवासाचे माजी आमदार संभाजीराव फाटके, अण्णासाहेब फाटके, वैष्णवतोष्णी दास आणि मुख्य संयोजक डॉ. सतीश फाटके उपस्थित होते. गिरीवरधारी दास यांनी स्वागतपर भाषणात डॉ. सतीश फाटके यांच्या विशेष पुढाकारातून या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन झाल्याचे सांगितले. शालिनीताई विखे व ज्योतीताई गाडे यांनी अहिल्यानगर शहरात इस्कॉनने उभारलेल्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक करून संयोजकांना शुभेच्छा दिल्या. गाडे यांचा सन्मान डॉ. अंजली फाटके यांनी, तर विखे यांचा सन्मान कमलिनीदेवी दास यांनी केला. मार्गदर्शनात मोबाईल संस्कृतीवर प्रहार करत मांडले मत कलीयुगात मानवी वृत्ती आसुरी होत चालल्याची खंत व्यक्त करत रेवतीनंदन दास म्हणाले, “मोबाईल आपल्या जीवनाचे मोठे नुकसान करत आहे. हे ठाऊक असूनही जेवतानाही लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. कौटुंबिक संवाद संपल्याने नैराश्य वाढते आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून, १८ हजार श्लोकांचा “भागवत’ ग्रंथच मानवी जीवनाला शाश्वत समाधानाचा मार्ग दाखवू शकतो.’ भक्तीतूनच विवेक जागृती “जन्मोजन्मीच्या पुण्याईनेच भागवत कथेच्या श्रवणाचे भाग्य लाभते. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि घमेंडीवृत्ती सोडून शरण गेल्यावरच भगवंत समजतो. जेव्हा मानवी जीवनात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य पुष्ट होते, तेव्हाच खऱ्या विवेकाचा उदय होतो. स्वतःचे गुणगान स्वतःच्या मुखाने न करण्याचा संस्कार भागवत शिकवते,” असे दास यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *