![]()
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, कारागृहातून बाहेर येताच अग्रवाल कुटुंबियांनी एकच जल्लोष केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या कथित पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, त्यात विशाल अग्रवाल हे गळ्यात नोटांचा हार घालून “मुंबई से आया मेरा दोस्त…” या प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर कुटुंबियांसह नाचताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि तो जामिनानंतरचाच आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना अजून न्याय मिळालेला नसताना, आरोपी कुटुंब पैशांच्या जोरावर असा उघड जल्लोष कसा करू शकते, असा संतप्त सवाल नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. नेमके प्रकरण काय? एका 17 वर्षे 8 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपली आलिशान पोर्शे कार अतिवेगाने चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुण आयटी इंजिनिअर्सना धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते, मात्र अवघ्या 15 तासांत त्याला जामीन मिळाल्याने राज्यभरातून तीव्र जनक्षोभ उसळला. वाढता दबाव पाहता प्रशासनाने निर्णय बदलत आरोपीची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली, तसेच अल्पवयीन मुलाला गाडी देणारे व निष्काळजीपणा करणाऱ्या त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. अल्पवयीन वाहन चालवण्याबद्दल नियम काय सांगतात? या प्रकरणाच्या निमित्ताने देशातील अल्पवयीन वाहन चालवण्याबाबतच्या कडक कायदेशीर नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये 16 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ 50cc पेक्षा कमी क्षमतेची गिअरलेस दुचाकी चालवण्याची परवानगी आहे. जर एखादा अल्पवयीन मुलगा चारचाकी चालवताना किंवा अपघात करताना पकडला गेला, तर त्यासाठी थेट त्याच्या पालकांना जबाबदार धरले जाते. या नियमानुसार पालकांना 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे, तसेच गुन्हा करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाला वयाच्या 25 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्याचा परवाना दिला जात नाही.
Source link
गळ्यात नोटांचा हार अन् बॉलीवूड गाण्यावर डान्स:पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या कथित पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल