![]()
जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली आहे. या घटनेमुळे शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कामावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात सध्या SIR व जनगणनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे शिक्षकांनाच करावी लागत आहेत. या प्रकरणी शिक्षक संघटना संतप्त सूर आळवत असताना जनगणनेच्या कामावर जाणाऱ्या एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्यांच्या मोपेडला जुना पुणे – मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे एका भरधाव वेगातील डंपरने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षकांना शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामावर बोलावले जात आहे. त्यामुळे शिक्षिका दीपाली तांबे यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल शिक्षकांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. त्यांनी महामार्गावरून होणाऱ्या डंपरच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचीही मागणी केली आहे. जनगणना करताना झालेला हा चौथा मृत्यू उल्लेखनीय बाब म्हणजे जनगणनेच्या कामावर जाताना झालेला हा आतापर्यंतचा चौथा मृत्यू आहे. यापूर्वी राज्यात अशा 3 घटना घडल्या होत्या. त्यात कोल्हापुरातील भगवान पाटील व सांगोला येथील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर लातूरच्या सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनांनंतर या सर्वच शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी, अशी मागणी कोल्हापुरातील खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. याविषयीचे निवेदन या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा दबाव शिक्षकांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. शिक्षकांच्या मते, जनगणना, एसआयआर, निवडणूक प्रक्रिया, विविध शासकीय सर्वेक्षणे व कागदपत्रांची पूर्तता अशा कामांमध्ये शिक्षकांना सतत गुंतवले जात आहे. त्यामुळे अध्यापनासाठी आवश्यक वेळ आणि ऊर्जा कमी पडत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षकांना प्रशासकीय कामांचा ताण सहन करावा लागत आहे. परिणामी, वर्गातील अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अतिरिक्त कामांच्या दबावामुळे शिक्षकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत आहे. शाळेतील नियमित कामकाज सांभाळताना वारंवार बदलणाऱ्या सूचना, ऑनलाइन माहिती भरण्याची सक्ती आणि वेळेत अहवाल सादर करण्याचे दडपण यामुळे अनेक शिक्षक त्रस्त झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शिक्षकांना मुख्यतः अध्यापनाच्या कार्यासाठीच वापरणे आवश्यक असून अशैक्षणिक जबाबदाऱ्यांचे प्रमाण कमी केल्यास शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची कार्यक्षमता दोन्ही सुधारू शकतात.
Source link