![]()
रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कारमूल्यांचा दीपस्तंभ आहे, असे निरुपण प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, सत्य, कर्तव्य, त्याग आणि भक्तीचे महत्त्व विशद करताना रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे (देवदैठण) यांनी केले
.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित श्रीराम कथेचा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. नऊ दिवस संपूर्ण गावात श्रीराम नामाचा गजर घुमत होता. श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या रामकथेला निमगाव वाघा आणि परिसरातील हजारो भाविकांनी अलोट गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील ऐतिहासिक श्री नवनाथ मंदिर परिसरात हा अध्यात्मिक सोहळा रंगला होता. कौठाळे महाराज यांनी आपल्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून रामायणातील विविध प्रसंगांचे प्रभावी निरूपण करत नऊ दिवस भाविकांना खिळवून ठेवले. कथेच्या प्रारंभी नाना डोंगरे यांनी व्यासपीठावर संतोष महाराज कौठाळे यांचे स्वागत केले.
या संपूर्ण रामकथेचे सर्वात मोठे आणि मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलांनी साकारलेले रामायणातील विविध जिवंत प्रसंग! बालकलाकारांनी प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण आदी पात्रांच्या वेशभूषा करून केलेले हुबेहूब सादरीकरण पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. विशेषतः ‘रावण वधा’चा थरारक प्रसंग आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचे अयोध्येत झालेले भव्य आगमन या प्रसंगी मंदिर परिसरात दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला. “जय श्रीराम”, “सियावर रामचंद्र की जय” च्या घोषणांनी निमगाव वाघा परिसर दणाणून गेला होता.
या धार्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन आणि नियोजनासाठी कथेचे आयोजक विठ्ठल महाराज फलके, नामदेव फलके, दत्तात्रय फलके, चंद्रकांत जाधव, पोपट भगत, अतुल फलके, छगन भगत, अशोक फलके, भाऊसाहेब ठाणगे, अरुण कापसे, किरण जाधव, सागर कापसे, बबन जाधव, जयराम जाधव यांच्यासह श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि निमगावच्या तरुण मंडळाने परिश्रम घेतले.