![]()
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सडेतोड भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील जादूटोण्याचे आरोप, संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी, शरद पवारांनी केलेले राज्य सरकारचे कौतुक, अंधेरीतील मराठीचा अपमान आणि बाबा फर्जन यांच्या घरावरील छापा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेने केलेले जादूटोण्याच्या गंभीर आरोपांबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “उबाठा गटाच्या प्रत्येक जणाला जादूटोणा करण्याची सवय आहे. ‘मातोश्री’वर काळी जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे आणि विनायक राऊत तर त्यात मास्टर आहेत. जादूटोण्याच्या विरोधात बोलायचे आणि स्वतः जादूगारांना जवळ ठेवायचे, ही यांची दुटप्पी भूमिका आहे. स्वतःच्या सुनेवर केस कापणे वगैरे जे क्रूर प्रकार झालेत, ते अत्यंत भयानक आहेत. सुनेने गुन्हा दाखल केलाच आहे, पण सरकारने सुद्धा या प्रकाराची दखल घेत ‘सुमोटो’ कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.” पोपटाने आधी उबाठाचे भविष्य सांगावे, राऊतांवर टीका देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, या संजय राऊतांच्या दाव्याची संजय शिरसाट यांनी खिल्ली उडवली. “संजय राऊत हा आता बावचळलेला माणूस आहे. हा नवीन तयार झालेला पोपट आहे. या पोपटाने दुसऱ्याचे भविष्य सांगण्यापेक्षा स्वतःच्या उबाठा गटाचे पुढील भविष्य काय आहे, ते सांगावे. महायुती मजबूत असून अशा बातम्यांचा आमच्यावर कोणताही परिणाम होत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या बातम्या या केवळ लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या वावड्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांकडून कौतुक, म्हणजे राजकीय रस्ते बदलण्याची चिन्हे राज्य सरकारने कर्जमाफी योजनेत केलेल्या बदलांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “शरद पवार साहेब इतक्या लवकर आपले पत्ते उघडत नाहीत. पण जर ते आता एनडीए आणि राज्य सरकारचे गुणगान गात असतील, तर याचा अर्थ त्यांचे राजकीय रस्ते आणि समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.” अंधेरीतील रेल्वे टीसी प्रकरण अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठीत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला टीसीने डांबून ठेवल्याच्या घटनेचा संजय शिरसाट यांनी तीव्र निषेध केला. “रेल्वेतील बहुतांश भरती ही हिंदी भाषिकांची आहे. एखाद्या माणसाने स्वाभिमानाने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला, तर त्याला तासभर बसवून ठेवले जाते. असे प्रकार महाराष्ट्रात घडत असतील, तर याचा गांभीर्याने विचार करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. बाबा फर्जनच्या घरावरील छाप्यावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगरमधील दिवंगत डॉन बाबा फर्जनच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड सापडली आहे. या कारवाईवर संजय शिरसाट यांनी काही प्रश्न उपस्थित केले. “बाबा फर्जन हा एकेकाळचा डॉन असला, तरी तो सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाचा आणि एक ‘हिंदू नेता’ म्हणून ओळखला जायचा. त्यांच्या निधनानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये, कोणीही राहत नसलेल्या बंद घरावर १८-१८ तास छापा का मारला गेला? याची खबर कोणी दिली होती? या कारवाईवर निश्चितच प्रश्नचिन्ह असून, याबाबत आम्ही पोलिस आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेऊ,” असे ते म्हणालेत. देवी-देवतांना मध्ये घेऊन न्यायाधीशांनी वक्तव्य करणे योग्य नाही “निदा खान धर्मांतर प्रकरणात निदा खानला तुम्ही माणुसकीच्या नात्याने सहकार्य केले, यात काही संशय नाही, करा मदत. ती गर्भवती आहे. तिला मदत करा, परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचे आयुष्य उध्वस्त केले याचा विचार करा आणि या प्रकाराला तुम्ही देवीदेवतांचे नावे लावून, श्रीकृष्णांची उदाहरण देऊन निर्णय देत असाल तर हे हिंदूंना सहन होणार नाही. तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्या विषयावर निकाल दिला असता तर आम्हाला अडचण नव्हती. मात्र देवी देवतांना मध्ये घेऊन असे वक्तव्य न्यायाधीशाने करणं, मला योग्य वाटलं नाही,” असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले. कन्हैया कुमारवर पलटवार “कन्हैया कुमारला स्वतःचे अस्तित्व नाही. तो फक्त भाषणे देतो. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याइतकी त्याची लायकी नाही, शिंदे साहेबांनी जे करून दाखवले तेवढी हिंमत कन्हैया कुमारमध्ये नाही,” असे प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिले.
Source link
मातोश्रीवर बंगालचा जादूगार येतो, हे सर्वांना माहीत आहे:विनायक, संजय राऊतांवर मंत्री शिरसाटांची टीका, पवारांच्या स्तुतीवरही मांडली भूमिका