Headlines

18 जुलैला नागपुरात उद्धव ठाकरेंचे 'रामरक्षा' आंदोलन:संघभूमी अन् फडणवीसांच्या शहरात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ‘रामरक्षा’ आंदोलन आता नागपुरात होणार आहे. येत्या 18 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडेल. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने, या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीत कथित घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपच्या राजवटीतच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील दानपेटीवर दरोडा पडल्याचा गंभीर दावा पक्षाने केला आहे. या प्रकरणी काही जणांना अटक झाली असून, न्यासाच्या प्रमुखांना राजीनामे द्यावे लागले आहेत. मात्र, मूळ सूत्रधार अजूनही मोकळे असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येत आहेत,’ असे राऊत म्हणाले. राम मंदिर आणि रामाच्या बदनामीचा निषेध करण्यासाठीच नागपुरात ही ‘रामरक्षा’ कडाडणार असल्याचे उबाठा पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना विदर्भात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण विदर्भातील शिवसैनिक आणि रामप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *