![]()
पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत लेखी शासन निर्णय (जीआर) किंवा ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’, झिरवळांचा सल्ला मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आले असताना त्यांच्यात संवाद झाला. यावेळी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ असा सल्ला दिल्याचे समोर आले. झिरवळ यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘खाऊन-पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही इथे आलेच नसते,’ अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. या संवादामुळे आंदोलनस्थळी काही काळ वातावरण हलकेफुलके झाले. मात्र, झिरवळ यांच्या वक्तव्यावर काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. 14 मागण्यांवर पाच तास चर्चा आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास बैठक घेतली. बैठकीनंतर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले. मात्र, काही मागण्यांबाबत तांत्रिक बाबी तपासणे आवश्यक असल्याने निर्णय घेण्यासाठी त्यांनी आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात असले, तरी विद्यार्थी मात्र लेखी आश्वासनावर ठाम आहेत. केवळ तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चर्चेनंतरही आंदोलन आणि उपोषण सुरूच आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आंदोलनाबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांच्या गंभीर मागण्यांची आणि त्यांच्या आंदोलनाची थट्टा केली जात असल्याची भावना काही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची भूमिका ठाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिक्षण, विद्यार्थी सुविधा आणि आदिवासी विकासाशी संबंधित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. सलग 14 दिवस आंदोलन सुरू असूनही मागण्यांवर अंतिम निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मंत्री अशोक उईके यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. मात्र, सरकारकडून मागण्यांची अंमलबजावणी करण्याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सरकार दोन दिवसांत कोणता निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांच्या 14 मागण्यांवर नेमका काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्या ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ या वक्तव्याचीही राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा.. तक्रारीनंतर 155 दिवसांनी औषध निरीक्षकपद भरतीतपेपरफुटी उघड:एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 अटकेत, आरोपींना 8 दिवसांची कोठडी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार २३ मार्च रोजी एफडीएकडे झाली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. २१ जुलै रोजी एमपीएससीकडे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ई-मेलवर तक्रार केली. तेव्हाही पेपर फुटल्याचे नाकारले. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासात १५५ दिवसांनी पेपर फुटल्याचे निदर्शनास आले.सविस्तर वाचा..
Source link
झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा:आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम