![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ‘4 BIN HAR DIN’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १८ मधील जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलाल नगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मनपाच्या IEC (माहिती, शिक्षण आणि संवाद) टीमने विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन २०२६ च्या नवीन नियमावलीची सविस्तर माहिती दिली. कचऱ्याचे स्रोतावरच योग्य वर्गीकरण केल्याने शहर स्वच्छ राहते, कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लागते आणि पर्यावरण संवर्धनास मदत होते, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. ‘4 BIN HAR DIN’ या अभियानांतर्गत कचरा वर्गीकरणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यामध्ये हिरव्या डब्यात ओला कचरा, निळ्या डब्यात सुका कचरा, लाल डब्यात घातक घरगुती कचरा आणि काळ्या डब्यात सॅनिटरी कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले. लहान वयापासूनच कचरा वर्गीकरणाची सवय लागल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंब आणि समाजावर होतो, असेही नमूद करण्यात आले. या अभियानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. विद्यार्थ्यांनी चार प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण दर्शवणारे फलक हातात घेऊन स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा कमी वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि घरामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडीत कचरा देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीवही करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘4 BIN HAR DIN’ संकल्पना आपल्या घरात व परिसरात राबवण्याचा आणि स्वच्छतेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात घनकचरा व्यवस्थापन २०२६ च्या नवीन नियमावलीनुसार विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, व्यापारी आस्थापना आणि नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक नागरिकाने कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये द्यावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
Source link
'4 BIN HAR DIN' अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद:मनपा IEC टीमच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळीतून जनजागृती