Headlines

मनाची शांतता केवळ भगवंताच्या नामातच…:ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांचे निरुपण, पैशाने भौतिक सुख मिळते‎




आजच्या युगात माणसाकडे धनदौलत, सौंदर्य, उच्च शिक्षण आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य असले, तरी जर मनात घमेंड असेल, तर तो कधीही भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. दुर्योधनासारखा अहंकार बाळगणाऱ्यांचा नाश निश्चित असतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पैसा तुम्हाला भौतिक सुख-साधने मिळवून देईल, मात्र शाश्वत सुख आणि मनाचे समाधान केवळ भगवंताच्या भक्तीतच मिळू शकते, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते भाविकांशी संवाद साधत होते. या प्रसंगी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, मगनभाई पटेल, अशोक कानडे, मदन कांबळे, राजूभाई पटेल, मिलिंद चवंडके आणि डॉ. अंजली फाटके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महाप्रसाद सेवेबद्दल अॅड. कुंदा दांगट यांचा ग्रंथ भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. रेवतीनंदन दास यांनी व्यावहारिक उदाहरणे देत पैशाची मर्यादा स्पष्ट केली. ते म्हणाले, भरपूर पैसे असणाऱ्या व्यक्तीसमोर उत्तम पक्वान्नाचे ताट असूनही मधुमेहामुळे (डायबिटिस) ती खाऊ शकत नाही. सर्व सुख-साधने उपलब्ध असूनही रात्रीची शांत झोप विकत घेता येत नाही. गंगास्नान केल्याने माणसाची पापे नक्कीच नष्ट होतात, परंतु मनातील पापवृत्ती नष्ट होत नाही. गीता आणि भागवत ग्रंथ हे माणसाच्या मनातील पापवृत्तीचा मुळापासून नाश करून परम पवित्र भगवंताची भेट घडवून आणतात. भागवत कथा ही संसाराचा ताप घालवून मानवी जीवनाला शितलता प्रदान करणारी असून ती मोह, माया, मद, मत्सर आणि लोभ नष्ट करते. ज्या घरात भगवंताच्या कथेचे निरूपण आणि श्रवण होते, तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा बाहेरील बाधा टिकू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनातील दुःखाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कुंतीचे उदाहरण दिले. जीवनात दुःख आले की माणसाला भगवंताची आठवण होते, म्हणूनच भगवंताचे निरंतर स्मरण राहावे यासाठी स्वतःसाठी दुःख मागणारी महाराणी कुंती होती, हे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या तरुण पिढीवर भाष्य करताना त्यांनी पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपण्याचे आवाहन केले. “धर्म आणि संस्कृतीतून येणारे नात्यांचे महत्त्व न समजल्यामुळे आजचे युवक-युवती एकमेकांना धोके देत आहेत. संसारिक नात्यात फसवणूक होऊ शकते, मात्र भगवान कधीही कुणाला धोका देत नाहीत. भागवत कथा माणसाला याच धोक्यांपासून सावधान राहण्याचा संदेश देते,” असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *