Headlines

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना जाहीर:गुणवंत विद्यार्थ्यांकडून 24 जुलैपर्यंत अर्ज मागवले




साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, अमरावती यांनी जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम बारा पोटजातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै आहे. या योजनेंतर्गत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल. निधीच्या उपलब्धतेनुसार आणि गुणक्रमानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निवड करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, संबंधित परीक्षेची गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईझ फोटो आणि आधार कार्ड यासह सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव २४ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, अमरावती’ या पत्त्यावर सादर करावेत. महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एम. टी. खडसे यांनी हे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *