Headlines

नांदेड जिल्ह्यात पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’:93 सराईत गुन्हेगारांची तपासणी; 122 मपोका अन्वये दोन गुन्हे दाखल, 57 समन्स व 37 वॉरंट बजावले




नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून सराईत गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच संशयित व्यक्तींची सखोल तपासणी केली. या कारवाईत ९३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून, पाहिजे व फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १ सप्टेंबर रोजी रात्रीपासून २ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान तडीपार व प्रस्तावित तडीपार व्यक्ती, हिस्ट्रीशीटर, सराईत गुन्हेगार तसेच MPDA कारवाईतून सुटलेल्या गुन्हेगारांच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या विशेष मोहिमेत ५७ समन्स आणि ३७ वॉरंट बजावण्यात आले. त्यापैकी १६ नॉन-बेलेबल वॉरंटमधील आरोपींना संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील सराईत व प्रतिबंधित गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच आरसीपी पथकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *