![]()
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून नाराजी समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मुंबईतील काही पदाधिकारी या नियुक्तीच्या विरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबईतील पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी आली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. झिशान सिद्दिकींच्या नियुक्तीनंतर कांबळेंचा राजीनामा मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाने सोपवलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कांबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षाच्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त केला आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आपण मनापासून आदर करतो, असे सांगतानाच त्यांनी मुंबई कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘साथ सुटली दादांची, पण विचार अजून जिवंत आहे’ सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये भावनिक शब्दांत भूमिका मांडली. ‘साथ सुटली दादांची, पण विचार अजून जिवंत आहे, पद सोडले जरी, तरी निष्ठेचा दिवा अखंड तेवत आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. या शब्दांतून अजित पवार यांच्याशी असलेले आपले नाते आणि पक्षातील पुढील वाटचालीबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कांबळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून गेल्या 27 वर्षांपासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अजित पवार यांनी आपल्यातील दलित चेहरा आणि सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेऊन वेळोवेळी ताकद दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पक्षात काम करण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात आपल्याला खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होत असल्याचे कांबळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार पक्षाची धुरा ताकदीने आणि संयमाने सांभाळत आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भक्कम साथ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘वहिनींच्या निर्णयाचा मनापासून आदर’ मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य करताना कांबळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे स्पष्ट केले. पक्ष चालवताना नेतृत्वाला अनेकदा कठोर आणि मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, याची पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयामागे नेतृत्वाबद्दल अनादर नसल्याचे त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट होते. ‘नुकताच मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय समोर आला आहे. पक्ष चालवताना आदरणीय वहिनींना अनेकवेळा कठोर आणि मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. वहिनींनी घेतलेल्या निर्णयाचा मी मनापासून आदर करतो. मात्र, बऱ्याच विचारांती मी माझ्यावर सोपवण्यात आलेल्या मुंबई कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे कांबळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी गेल्या अडीच वर्षांत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तन-मन-धनाने पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. पद सोडले, तरी पक्षात काम सुरू ठेवणार मुंबई कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी आपण पक्षापासून दूर जाणार नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. पदावर असो किंवा नसो, पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पुढेही काम करत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील पक्षाचे काही पदाधिकारी या नियुक्तीच्या विरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेली नाराजी आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व या नाराजीवर कशी भूमिका घेते आणि मुंबईतील संघटनात्मक समीकरणांमध्ये काही बदल होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद:जामखेडमध्ये महिलांचा माठफोड मोर्चा, श्रीरामपुरात उपोषणाचा इशारा जिल्ह्यात उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले असून, अनेक शहरांमध्ये विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जामखेड शहरात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढत माठफोड आंदोलन केले. दुसरीकडे, श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. श्रीरामपुरात पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याबरोबरच गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सविस्तर वाचा….
Source link
राष्ट्रवादीत झिशान सिद्दिकींच्या मुंबई अध्यक्षपदावरील नियुक्तीवरून नाराजी:कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाला भेट घेणार