![]()
आम आदमी पार्टीच्या (आप) नागपूर शहर शाखेने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या कथित सक्तीविरोधात निषेध मोर्चा काढला. गांधीगेट, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, वाहनधारक, युवक, महिला आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहर कार्याध्यक्ष डॉ. अमेय नारनवरे, गिरीश तितरमारे, सचिन लोणकर, रोशन डोंगरे, शाहिद अन्वर आणि आतिश तायवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आपच्या मते, ई-२० पेट्रोलचा वापर देशातील जुन्या वाहनांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित नाही. यामुळे वाहनांचे इंजिन खराब होऊ शकते, मायलेज कमी होऊ शकते आणि देखभाल खर्च वाढून सर्वसामान्य वाहनधारकांवर नाहक आर्थिक भार पडू शकतो. वाहन उत्पादक कंपन्या आणि तज्ज्ञांनी जुन्या वाहनांबाबत काळजी घेण्याचे निर्देश दिले असतानाही केंद्र सरकारने हा निर्णय जनतेवर लादणे अयोग्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, आपने केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये ई-२० पेट्रोलची सक्ती तत्काळ थांबवावी, जुन्या वाहनधारकांच्या हिताचे रक्षण व्हावे आणि वाहनांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमून तिचा अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे. तसेच, सर्व पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी सामान्य पेट्रोल आणि ई-२० पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत, जेणेकरून जनतेची फसवणूक होणार नाही, अशी मागणीही करण्यात आली. हा निषेध कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून केवळ जनहितासाठी आणि लोकशाही मार्गाने केलेला शांततापूर्ण लढा असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. मोर्चानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर करून जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
Source link
ई-20 पेट्रोल सक्तीविरोधात 'आप'चा गडकरींच्या घरावर मोर्चा:जुन्या वाहनांसाठी धोकादायक असल्याचा पक्षाचा आरोप